शुभमन गिलचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेलने दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर कोलकात्याने पंजाबवर ७ गडी राखून मात केली. या पराभवासह पंजाबचे IPL 2019 मधील आव्हान संपुष्टात आले. पण या विजयासह कोलकाताचे मात्र बाद फेरीसाठीचे आव्हान अजूनही टिकून आहे.

या सामन्यात शुभमन गिलने नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ४९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. पण महत्वाचे म्हणजे त्याने एक बाजू लावून धरली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने अर्धशतक केल्यानंतर स्टेडियमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांनी भांगडा नृत्य करत त्याचे अर्धशतक साजरे केले. त्यांच्या हा व्हिडीओ IPL ने ट्विट केला आहे.

दरम्यान, १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ख्रिस लिन जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करुन दिली. अँड्रू टायने स्वतःच्या गोलंदाजीवर लिनचा झेल पकडत कोलकात्याला पहिला धक्का दिला. लिनने ४६ धावा केल्या, त्याचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं. लिन माघारी परतल्यानंतरही गिलने एक बाजू भक्कमपणे लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. यादरम्यान गिलने आपलं अर्धशतकही साजरं केलं. त्याने नाबाद ६५ धावांची खेळी केली.

यानंतर रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात पंजाबला यश आलं खरं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा गिल-कार्तिक जोडीने पूर्ण करत पंजाबच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. पंजाबकडून मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन आणि अँड्रू टाय यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने घरच्या मैदानावर १८३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या षटकापासून भेदक मारा करत पंजाबच्या धावगतीवर अंकुश ठेवला. मात्र अखेरच्या षटकात मनदीप सिंह, सॅम करन, निकोलस पूरन यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांना तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याला यश आलं. यानंतर निकोलस पूरन आणि मयांक अग्रवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. या भागीदारीमुळे पंजाबचा डाव सावरला, मात्र नितीश राणाने पूरनचा अडथळा दूर करुन पंजाबला तिसरा धक्का दिला.

यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कोलकात्याला चांगली झुंज दिली. सॅम करनने अर्धशतकी खेळी करत नाबाद ५५ धावा केल्या. कोलकात्याकडून संदीप वॉरियरने २ तर हॅरी गुर्ने, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. पंजाबचा एक फलंदाज धावबाद झाला.