IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रकारावरून क्रिकेट विश्वात तीव्र पडसाद उमटले असून दिग्गज क्रिकेटपटूंनी पंचांच्या हलगर्जीपणावर सडकून टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने हा निर्णय देणाऱ्या पंचांना सुनावले. क्रिकेट आता आधुनिक झाले असून तंत्रज्ञानाचा वापर का करण्यात आला नाही? असा सवाल त्याने केला. तर केवळ गडी बाद झाल्यावरच नो बॉल न तपासता तंत्रज्ञानाचा वापर योग्य करण्यात यायला हवा, असे मत फाफ डू प्लेसी याने व्यक्त केले आहे. याशिवाय, समालोचक संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले, आकाश चोप्रा, डीन जोन्स यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. तर प्रग्यान ओझा, मोहम्मद कैफ, केविन पीटरसन, मायकल वॉन या खेळाडूंनी पंचावर टीका केली.

दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर ६ धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने १९ व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या १८ धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात ३ बळी घेतले. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने ७० धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली.

त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rcb vs mi cricket greats and legends slams umpires for no ball controversy
First published on: 29-03-2019 at 12:25 IST