IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजचे म्हणजेच साखळी सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी सामने होणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाचे दरवर्षीप्रमाणे निम्मे सामने स्वतःच्या घरच्या मैदानात आणि निम्मे सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर होणार आहेत. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर संघाला मोठा झटका बसला आहे.
यंदाच्या लिलाव प्रक्रियेत कोलकाता संघाने खरेदी केलेला एक खेळाडू दुखापतीमुळे IPL 2019 ला मुकणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्ये याला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. लिलाव प्रक्रियेत त्याची मूळ किंमत २० लाख रुपये इतकी होती. याच मूळ किमतीला त्याला विकत घेतले गेले. कोलकाता संघाकडे असलेले शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या दोघांनी आधीच IPL 2019 मधून माघार घेतली होती. त्यात आता कोलकाता संघाचा तिसरा वेगवान गोलंदाज दुखापतीचा फटका बसल्याने स्पर्धेबाहेर झाला आहे.