IPL 2019 हैदराबादच्या मैदानावर बाद फेरीत यजमानांचेच आव्हान संपुष्टात आले. दिल्लीने सामन्यात हैदराबादवर २ गडी राखून मात केली आणि क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून शॉचे अर्धशतक झाले, पण सामन्याला कलाटणी ऋषभ पंत खेळीमुळे मिळाली.

या सामन्यानंतर बोलताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने आपल्या संघाची हार मानली. झेल पकडणे, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या आघाड्यांवर केलेली खराब कामगिरी यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, असे विल्यमसन याने प्रामाणिकपणे कबूल केले.

हैदराबादची खेळपट्टी ही अटीतटीच्या सामन्यांसाठी ओळखली जाते. आम्ही जितकी धावसंख्या उभारली होती, ती धावसंख्या नक्कीच स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होती. धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्ले च्या षटकानंतर फलंदाजांना चेंडू टोलवणे कठीण जाईल याची मला चांगलीच कल्पना होती. काही सामन्यात आपला संघ चांगल्या परिस्थितीत असतो, पण सामन्याचा निकाल आपल्याला हवा तसा लागत नाही. आमच्या बाबतीत तेच दिल्लीविरुद्धच्या सामन्यात झाले, असे विल्यमसन म्हणाला.

दिल्लीच्या विजयाबाबतही त्याने मत व्यक्त केले. तो म्हणाला की दिल्लीच्या संघाने उत्तम कामगिरी केली. त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला, त्यावरून ते जिंकले जिंकणे क्रमप्राप्तच होते. त्यांच्या संघात उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आम्ही खेळपट्टीचा अंदाज घेऊन योग्य रणनीतीने खेळत होतो. पण आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्यामुळे आम्ही कमी पडलो आणि आमचा पराभव झाला, असेही विल्यमसन म्हणाला.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं.

त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे हैदराबादला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून सलामीवीर मार्टीन गप्टील, मनिष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर यांनी चांगली झुंज दिली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अखेरच्या षटकांमध्ये विजय शंकर आणि मोहम्मद नबी यांनी फटकेबाजी करत हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल.