आयपीएल २०२१ स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसं प्लेऑफसाठीचा संघर्ष रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत ४३ सामने खेळले गेले असून १३ सामने उरले आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे. तर राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स यांचं प्लेऑफमधील स्थान डळमळीत आहे. मुंबईलाही पुढचे तीन सामने जिंकत प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. तळाशी असलेल्या हैदराबादचंही जर तर वर अवलंबून आहे. चार सामने जिंकत इतर संघाच्या गुणांवर प्लेऑफमधील स्थान ठरणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्स- चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. चेन्नईने १० पैकी ८ सामन्यात विजय मिळवला असून २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेट रनरेट अधिक १.०६९ आहे. अजूनही चार सामने उरले असून प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज हैदराबादला पराभूत केल्यात प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यात ८ मध्ये विजय तर ३ सामन्यात पराभव सहन केला आहे. सध्या दिल्लीचे १६ गुण असून नेट रनरेट अधिक ०.५६२ आहे. चेन्नईसारखंच दिल्लीचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित आहे. आता ३ सामने उरले असून एका सामन्यात विजय मिळवल्यास प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहलीच्या आरसीबीने आतापर्यंत एकही आयपीएल किताब जिंकलेला नाही. मात्र या स्पर्धेत बंगळुरूची कामगिरी चांगली आहे. बंगळुरू संघ आतापर्यंत ११ सामने खेळला असून ७ सामन्यात विजय, तर ४ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. बंगळुरूचे एकूण १४ गुण असून नेट रनरेट उणे ०.२०० आहे. बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उरलेल्या ३ पैकी १ सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

कोलकाता नाइट राइडर्स- आयपीएलचा किताब दोन वेळा आपल्या नावावर करणाऱ्या कोलकाताने या स्पर्धेत ११ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यात पराभूत झाला आहे. कोलकात्याच्या पारड्यात आता १० गुण असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुढचे तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. पुढचे तीन सामने पंजाब किंग्स, सनराइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्ससोबत आहे.

मुंबई इंडियन्स- मुंबईनं पाच वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी झालेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या ११ पैकी ५ सामन्यात विजय, तर ६ सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. यासह गुणतालिकेत मुंबईचा संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट उणे ०.४५३ आहे. मुंबईचे पुढचे तीन सामने दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद सोबत आहे. तिन्ही सामने जिंकत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी आहे.

पंजाब किंग्स- आयपीएल इतिहासात पंजाबची कामगिरी निराशाजनक आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने ११ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यात पंजाब संघ पराभूत झाला आहे. यासह पंजाबच्या पारड्यात ८ गुण आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई सोबत पुढचे सामने आहेत. यापैकी एकही सामना गमावल्यास पंजाबचा संघ स्पर्धेबाहेर जाईल.

राजस्थान रॉयल्स- आयपीएल स्पर्धेतील पहिला किताब राजस्थानने जिंकला होता. त्यानंतर संघाची कामगिरी हवी तशी झाली नाही. या स्पर्धेत राजस्थाननं ११ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामने जिंकूनही त्यांना इतर संघांच्या कामगिरी अवलंबून राहावं लागणार आहे.

सनराइजर्स हैदराबाद- यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हैदराबादची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. १० पैकी केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. आज हैदराबादचा सामना चेन्नईसोबत आहे. त्यानंतर कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईसोबत लढत असणार आहे. हैदराबादला चारही सामने जिंकत दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र असं झाल्यास चमत्कारच म्हणावं लागेल. चार पैकी एकही सामना गमवल्यास स्पर्धेबाहेर जाईल.