फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी आणि हर्षल पटेलच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी मात दिली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे रोहितच्या पलटनला पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक नाणेफेक गमावलेल्या बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल यांची अर्धशतके आणि केएस भरतच्या महत्त्वपूर्ण धावांमुळे बंगळुरूला ही धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात मुंबईच्या स्टार फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकला गेला आहे. त्यामुळे त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे.

मुंबईचा डाव

बंगळुरुच्या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईसाठी ५७ धावांची सलामी दिली. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मुंबईला पहिला धक्का दिला. मोठा फटका खेळण्याच्या नादात क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. त्याने २४ धावा केल्या. फलंदाजीत कमाल केलेल्या ग्लेन मॅक्सवेलने गोलंदाजीत चमक दाखवत रोहितला बाद केले. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार, ईशान, हार्दिक, कृणाल आणि पोलार्ड यांनी सपशेल निराशा केली. बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने १७व्या षटकात हॅट्ट्रिक घेत मुंबईची विजचाची आशा संपुष्टात आणली. मुंबईचा संघ १८.१ षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. हर्षलने १७ धावांत ४, चहलने ११ धावांत ३ तर मॅक्सवेलने २३ धावांत २ बळी घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा – CSK vs KKR : सर ठरला बाजीगर..! धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना

बंगळुरूचा डाव

मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर देवदत्त पडिक्कलला शून्यावर बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली आणि केएस भरत यांनी कोणताही दबाव न घेता संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये विराट कोहलीने आपल्या आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. दरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. फिरकीपटू राहुल चहरला मोठा फटका खेळण्याच्या नादात केएस भरत झेलबाद झाला. सूर्यकुमारने त्याला झेल टिपला. भरतने ३२ धावा जोडल्या आणि विराटसोबत ६८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट आणि मॅक्सवेलने संघाची कमान सांभाळली. १३व्या षटकात बंगळुरूने आपले शतक फलकावर लावले. विराटने १५व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर विराट बाद झाला. मिल्नने विराटला तंबूत धाडले. विराटने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. १८व्या षटकात मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी करत आयपीएलमधील आपले नववे अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात बुमराहने मॅक्सवेलला आणि एबी डिव्हिलियर्स यांना तंबूचा रस्ता दाखवला. मॅक्सवेलने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात बंगळुरूला फक्त ३ धावा करता आल्या. बुमराहने ४ षटकात ३६ धावा देत ३ बळी घेतले.

Live Updates
23:20 (IST) 26 Sep 2021
बंगळुरूची मुंबईवर ५४ धावांनी मात

हर्षलने मुंबईच्या मिल्नची दांडी गुल करत अजून एक यश मिळवले. यासह मुंबईचा संघ १८.१ षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. बंगळुरूने मुंबईवर ५४ धावांनी मात केली. हर्षलने १७ धावांत ४, चहलने ११ धावांत ३ तर मॅक्सवेलने २३ धावांत २ बळी घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

23:13 (IST) 26 Sep 2021
मुंबईचा नववा गडी माघारी

फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने जसप्रीत बुमराहची दांडी गुल करत बंगळुरूचा विजय निश्चित केला.

23:05 (IST) 26 Sep 2021
हर्षल पटेलची हॅट्ट्रीक

तब्बल दोन महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या हार्दिक पंड्यालाही विशेष काही करता आले नाही. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने १७व्या षटकात त्याला विराटकरवी झेलबाद केले. त्यानंतर हर्षलने पोलार्डला पुढच्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चहरला पायचित पकडून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.

23:03 (IST) 26 Sep 2021
मुंबईला विजयासाठी २४ चेंडूत ६० धावांची गरज

१६व्या षटकात मुंबईने शतक पूर्ण केले. मुंबईला विजयासाठी २४ चेंडूत ६० धावांची गरज आहे.

22:51 (IST) 26 Sep 2021
मुंबईचा अर्धा संघ तंबूत

१५व्या षटकात मोहम्मद सिराजने सू्र्यकुमार यादवला झेलबाद केले. चुकीचा फटका खेळल्यामुळे सू्र्यकुमार वैयक्तिक ८ धावांवर बाद झाला.हार्दिक पंड्या मैदानात आला आहे.

22:48 (IST) 26 Sep 2021
मुंबईला ६९ धावांची गरज

मुंबईला ६ षटकात ६९ धावांची गरज असून सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड नाबाद आहेत.

22:42 (IST) 26 Sep 2021
कृणाल बाद

ग्लेन मॅक्सवेलने आपल्या शेवटच्या षटकात कृणालला बाद करत मुंबईला आणखी दबावात टाकले. मुंबईला विजयासाठी ४१ चेंडूत ७३ धावांची गरज आहे. कृणालनंतर कायरन पोलार्ड मैदानात आला आहे.

22:28 (IST) 26 Sep 2021
रोहितनंतर किशनही माघारी

पुढच्याच षटकात चहलने किशनला बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. किशन बाद झाल्यानंतर कृणाल पंड्या मैदानात आला आहे. मुंबईला ५७ चेंडूत ८५ धावांची गरज आहे.

22:24 (IST) 26 Sep 2021
रोहित बाद

१०व्या षटकात ग्लेन मॅक्सवेला मोठा फटका खेळताना रोहित झेलबाद झाला. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे. मुंबईने १० षटकात २ बाद ७९ धावा केल्या.

22:10 (IST) 26 Sep 2021
मुंबईला पहिला धक्का

फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मुंबईला पहिला धक्का दिला. मोठा फटका खेळण्याच्या नादात क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. त्याने २४ धावा केल्या. डी कॉकनंतर ईशान किशन मैदानात आला आहे.

22:04 (IST) 26 Sep 2021
पॉवरप्लेपर्यंत मुंबई

पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेपर्यंत मुंबईने बिनबाद ५६ धावा केल्या. रोहित २९ तर क्विंटन २४ धावांवर नाबाद आहे.

21:57 (IST) 26 Sep 2021
रोहित-क्विंटनची अर्धशतकी सलामी

पाचव्या षटकात रोहित आणि क्विंटनने डॅन ख्रिश्चनच्या षटकात १५ धावा वसूल करत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.

21:45 (IST) 26 Sep 2021
रोहितची फटकेबाजी

दुसऱ्या षटकात रोहितने काईल जेमीसनला लागोपाठ तीन चौकार लगावले.

21:30 (IST) 26 Sep 2021
मुंबईचे सलामीवीर मैदानात

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक मुंबईसाठी सलामी देण्यासाठी मैदानात आले आहेत.

21:18 (IST) 26 Sep 2021
मुंबईला १६६ धावांचं आव्हान

बंगळुरूने २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. मुंबईसाठी बोल्टने टाकलेल्या २०व्या षटकात बंगळुरूला ३ धावा करता आल्या.

21:13 (IST) 26 Sep 2021
बंगळुरुला अजून एक धक्का

२०व्या षटकात ट्रेंट बोल्टने शाहबाझ अहमदला क्लिन बोल्ड केले.

21:08 (IST) 26 Sep 2021
बुमराहचा डबल धमाका

१९व्या षटकात बुमराहने मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. पुढच्याच चेंडूवर बुमराहने डिव्हिलियर्सला तंबूत धाडले. डिव्हिलियर्सने ११ धावा जोडल्या.

21:02 (IST) 26 Sep 2021
मॅक्सवेलची जोरदार फटकेबाजी

१८व्या षटकात मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी करत आयपीएलमधील आपले नववे अर्धशतक पूर्ण केले.

20:50 (IST) 26 Sep 2021
विराट कोहली माघारी

१६व्या षटकात मिल्नने विराटला तंबूत धाडले. विराटने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला आहे.

20:49 (IST) 26 Sep 2021
विराट-मॅक्सवेलची अर्धशतकी भागीदारी

१६व्या षटकात एडम मिल्नला मॅक्सवेलने चौकार खेचत विराटसोबत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

20:41 (IST) 26 Sep 2021
विराटचे सलग दुसरे अर्धशतक

विराटने १५व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

20:28 (IST) 26 Sep 2021
बंगळुरूचे शतक पूर्ण

१३व्या षटकात बंगळुरूने आपले शतक फलकावर लावले. भरत माघारी परतल्यानंतर मॅक्सवेलने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

20:20 (IST) 26 Sep 2021
१० षटकांचा खेळ संपला

बंगळुरूने १० षटकात २ बाद ८२ धावा केल्या आहेत.

20:14 (IST) 26 Sep 2021
केएस भरत माघारी

राहुल चहरला मोठा फटका खेळण्याच्या नादात केएस भरत झेलबाद झाला. सूर्यकुमारने त्याला झेल टिपला. भरतने ३२ धावा जोडल्या आणि विराटसोबत ६८ धावांची भागीदारी केली. ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

20:13 (IST) 26 Sep 2021
हार्दिक पंड्याने सोडला विराटचा झेल

नवव्या षटकात फिरकीपटू राहुल चहरच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने विराटचा झेल सोडला.

20:00 (IST) 26 Sep 2021
पॉवरप्लमध्ये बंगळुरू

पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये विराट कोहलीने आपल्या आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. पडिक्कल बाद झाल्यानंतर त्याने कोणताही दबाव न घेता २० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३१ धावा फटकावल्या.

19:49 (IST) 26 Sep 2021
विराटच्या १० हजार धावा

टी-२० क्रिकेटमध्ये विराटने १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. विराटने मुंबई इंडियन्सविरुद्ध १३वी धाव काढताच ही कामगिरी केली. आतापर्यंत केवळ चार क्रिकेटपटूंना ही कामगिरी करता आली आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नर यांनी टी -२० क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. ३१३ टी-२० सामन्यांमध्ये कोहलीने भारतासाठी ९० आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २०२ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३१५९ धावा केल्या आहेत, तर आयपीएलमध्ये ६ हजारांहून अधिक धावा आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ५ शतके आणि ७३ अर्धशतके आहेत.

19:41 (IST) 26 Sep 2021
बंगळुरूला पहिला धक्का

मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर देवदत्त पडिक्कलला शून्यावर बाद केले. यष्टीपाठी क्विंटन डी कॉकने पडिक्कलचा झेल टिपला. पडिक्कलनंतर केएस भरत फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

19:35 (IST) 26 Sep 2021
विराटचा दमदार षटकार

बोल्टच्या पहिल्याच षटकात विराटने षटकार ठोकत उत्तम सुरुवात केली. पहिल्या षटकात बंगळुरूने बिनबाद ७ धावा केल्या.

19:30 (IST) 26 Sep 2021
बंगळुरूचे सलामीवीर मैदानात

बंगळुरूचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल मैदानात आले आहेत. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत आहे.

19:12 (IST) 26 Sep 2021
मुंबई संघात हार्दिकचं कमबॅक

आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचे कमबॅक झाले आहे. सौरभ तिवारीला विश्रांती मिळाली आहे. तर बंगळुरू संघात डॅन ख्रिश्चन, काईल जेमीसन, शाहबाज अहमद यांना संधी मिळाली आहे.

19:06 (IST) 26 Sep 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंडया, एडम मिल्न, जसप्रीत बुमराह,  ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कप्तान), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिश्चन, केएस भरत, काईल जेमिसन, मोहम्मद सिराज, यजु्र्वेंद्र चहल, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल.

19:03 (IST) 26 Sep 2021
नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/IPL/status/1442120867882831880

18:36 (IST) 26 Sep 2021
हेड-टू-हेड आकडेवारी

दोन्ही संघांची आकडेवारी पाहायची झाली, तर यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये मुंबईने १९ वेळा, तर आरसीबीने ११ वेळा विजय मिळवला आहे. आरसीबीने गेल्या ७ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला फक्त दोनदा पराभूत केले आहे.

18:34 (IST) 26 Sep 2021
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंडया, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह,  ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली (कप्तान), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेव्हिड, एस भरत, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, यजु्र्वेंद्र चहल, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल.