आयपीएल २०२१ स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर २ गडी राखून मात केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात खऱ्या अर्थाने सर रवींद्र जडेजा बाजीगर ठरला. संघातील खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर सामना कोलकात्याच्या बाजूनं झुकला होता. मात्र सामना सहज सोडेल, तर तो सर कसाला? अखेर रवींद्र जडेजा पुन्हा एकदा सर ही पदवी खरी करून दाखवली. १९ व्या षटकात आक्रमक खेळी करत विजय जवळ खेचून आणला. रविंद्र जडेजाने ८ चेंडूत २२ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मात्र विजयी फटका मारण्याच्या नादात शेवटच्या षटकात सुनील नरेनच्या चेंडूवर पायचीत झाला.

कोलकात्यानं दिलेलं १७२ धावांचंआव्हान पूर्ण करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस जोडी मैदानात उतरली. या जोडीनं संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७४ असताना चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला धक्का बसला. ऋतुराज २८ चेंडूत ४० धावा करून तंबूत परतला. या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. त्यानंतरही फाफनं आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. फाफला मोइन अलीची साथ मिळाली. संघाची धावसंख्या १०२ असताना डुप्लेसिस बाद झाला. त्याने ३० चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मैदानात आलेला अंबाती रायडू खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. सुनील नरेननं त्याचा त्रिफळा उडवला. ९ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने त्याने १० धावा केल्या. मोइन अली बाद झाल्याने चेन्नईला चौथा धक्का बसला. मोइननं २८ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला होता. मात्र सीमेवर वेंकटेश अय्यरनं झेल घेऊन तंबूचा रस्ता दाखवला. मोइन अलीनंतर लगेचच सुरेश रैना २ धावा घेण्याच्या नादात बाद झाला. सुरेश रैनाच्या मागोमाग धोनीही त्रिफळाचीत झाला. वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाने आक्रमक खेळी करत विजयापर्यंत आणलं. मात्र सॅम करन बाद झाल्याने संघावरील दडपण वाढलं. त्यानंतर शार्दुल ठाकुर तीन धावा करत जडेजाला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत १ धावा हवी असताना पहिला चेंडू हुकला. त्यानंतरच्या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. मात्र शेवटच्या चेंडूवर दीपक चाहरने फटका मारत संघाला विजय मिळवून दिला.

चेन्नई- एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सॅम करेन, फाफ डुप्लेसिस, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवूड

कोलकाता- इऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती