विराट कोहलीला इंडियन प्रीमियर लीगच्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या सुरु असणारं उर्वरित पर्व पूर्ण होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबीच्या कर्णधार पदावरुन हटवण्यात येणार आहे. एका माजी कर्णधारानेच यासंदर्भातील वक्तव्य केलं आहे. सोमवारी अबू धाबीमध्ये झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरोधच्या सामन्यामध्ये आरसीबीची सुमार कामगिरी आणि विराटची बॉडी लँगवेज पाहून अनेकांना विराटची कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं जाणकार सांगतात. आरसीबीने आयपीएल १४ च्या दुसऱ्या पर्वामध्ये अगदीच निराशाजनक सुरुवात केलीय. केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराटचा संघ ९२ धावा करुन तंबूत परतला. हा आरसीबीचा आयपीएलमधील सर्वात कमी स्कोअर ठरला. ६० चेंडू आणि ९ गडी राखून अवघ्या १० षटकांमध्ये केकेआरने हा सामना जिंकला.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कोहली चार चेंडूंमध्ये पाच धावा बनवून परतला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात विराटच्या रुपाने आरसीबीला पहिला झटका बसला. ३२ वर्षीय विराट प्रसिद्ध कृष्णाच्या एका आत वळणाऱ्या चेंडूवर पायचित झाला. यावर कोहलीने रिव्ह्यू घेतला मात्र त्याला बाद घोषित करण्यात आलं.

विराट या सामन्यादरम्यान मैदानामध्ये नेहमीप्रमाणे दिसून आला नाही. तो फारच निराश वाटत होता. विराटने या सामन्यापूर्वीच भारताच्या आंतरराष्ट्रीय टी २० संघाच्या कर्णधारपदाप्रमाणे आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केलीय. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही विराटने आयपीएलची अर्धी स्पर्धा शिल्लक असतानाच विराटने केलेल्या या घोषणेचा संघावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केलीय. तसेच ही घोषणा आयपीएलनंतर करायला हवी होती असंही गंभीर म्हणालाय.

क्रिकेटनेक्सटवरील एका वृत्तानुसार काही क्रिकेटपटूंनी विराट हा अशा अवेळी करण्यात आलेल्या कर्णधारपदासंदर्भातील घोषणामुळे अशांत आहे. एका माजी भारतीय कर्णधाराने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विराटला आरसीबीच्या कर्णधारपदावरुन स्पर्धा संपण्याआधीच हटवलं जाण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटूने, “तो केकेआरविरोधात कशापद्धतीने खेळत होता ते पाहा. तो हरवल्यासारखा वाटत होता. सध्या तो फार संघर्ष करतोय असं वाटतंय. मालिका सुरु असतानाच त्याला हटवलं जाण्याची शक्यता आहे. असं यापूर्वी इतर संघांसोबत झालेलं आहे. जसं केकेआरमध्ये दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये डेव्हिड वॉर्नर. त्यांना हटवण्यात आलं किंवा त्यांनी स्वत:हून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. हे असं आरसीबीमध्येही होऊ शकतो. केकेआर आणि आरसीबी सामन्यानंतर मला असं वाटतं आहे. एक अजून खराब सामना आणि आपल्याला लगेच आरसीबीचा कर्णधार बदलेला पहायला मिळू शकतो,” असं या क्रिकेटपटूने म्हटलं आहे.

कोहली २०१३ पासून आरसीबीचा कर्णधार आहे. डॅनिएल व्हिक्टोरिकडून त्याला हा कर्णधारपदाचा वारसा मिळाला. तेव्हापासून आरबीसीने १३२ सामन्यांपैकी ६२ सामने जिंकलेत आणि ६६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला असून ४ सामने अनिर्णित राहिलेत.