Trade List Ahead Of IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेपूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंतचा आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठा ट्रेड झाला आहे. दरम्यान आणखी काही खेळाडू आहेत, जे एका संघातून दुसऱ्या संघात गेले आहेत.

जडेजासह सॅम करन राजस्थानकडून खेळणार

रवींद्र जडेजासह चेन्नईचा आणखी एक शिलेदार सॅम करन हा आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला २.४ कोटी मोजून आपल्या संघात स्थान दिलं आहे. याआधी त्याला चेन्नई सुपर किंग्जसह पंजाब किंग्जकडून खेळण्याचा देखील अनुभव आहे.

मोहम्मद शमीची लखनौ सुपर जायंट्स संघात एंट्री

या स्पर्धेतील आणखी एक मोठा ट्रेड म्हणजे, गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व केलेला मोहम्मद शमी आगामी हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघात खेळताना दिसून येणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला १० कोटी मोजून आपल्या संघात स्थान दिलं आहे. शमी देखील अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे दिल्ली, पंजाब, हैदराबाद आणि गुजरात या संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे लखनौला त्याच्या अनुभवाचा चांगलाच फायदा होऊ शकतो.

हे स्टार खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळणार

मुंबईचा माजी फिरकीपटू मयांक मारकंडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून येणार आहे. गेल्या हंगामाता कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ३० लाखांची बोली लावून संघात घेतलं होतं. मुंबईने त्याला ३० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतलं आहे. यासह रुदरफोर्ड आणि शार्दुल ठाकूर देखील आगामी हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.

अर्जून तेंडुलकर लखनौकडून खेळणार

मुंबई इंडियन्स संघातील मध्यमगती गोलंदाज अर्जून तेंडुलकर आगामी हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. पदार्पण केल्यापासून तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण त्याला सातत्याने खेळण्याची संधी मिळालेली नाही.

नितीश दिल्लीकडून, फरेरा राजस्थानकडून खेळणार

गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा नितीश राणा आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.त्याला ४.२ कोटी रूपये मानधन मिळणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू डोनोवन फरेरा आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.