एकीकडे आयपीएलचा पंधरावा हंगामा जोमात सुरु असताना दुसरीकडे सीबीआयने मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सीबीईआयने देशात एकूण सात ठिकाणी छापेमारी करुन सात जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील दोन आरोपी हैदराबाद तर एक आरोपी दिल्ली येथील असल्याची माहिती मिळतेय. या आरोपींना पाकिस्तानमधून सूचना मिळत असल्याचाही सीबीआयला संशय आहे. सीबीआयने शनिवारी (१४ मे) ही कारवाई केली असून देशभरात चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा प्रकार आयपीएलच्या २०१९ सालच्या पर्वाशी निगडित आहे.

हेही वाचा >> आधी निवृत्त झाल्याचे केले जाहीर, नंतर घेतली माघार? अंबाती रायडूच्या ट्विटमुळे संभ्रम

जोधपूर येथील सज्जन सिंग तसेच जयपूर येथील प्रभुलाल मीना, राम अवतार, अमित कुमार शर्मा तसेच गुर्राम सतिश आणि गुर्राम वसू (हैदराबाद) तर दिलीप कुमार (दिल्ली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना आयपीएलच्या सामन्यांवर प्रभाव टाकण्यासाठी तसेच सट्टेबाजीसाठी पाकिस्तानमधून इनपूट्स मिळत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती, अशी नोंद एफआरआयमध्ये करण्यात आली आहे. २०१३ सालापासून हे नेटवर्क कार्यरत असून अनेक नागरिकांना सट्टेबाजी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही संशयही आरोपींवर आहे.सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे.

हेही वाचा >>नाद करा पण आमचा कुठं! विराट कोहलीने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू

विशेष म्हणजे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे रॅकेट चालवणाऱ्या या आरोपींचे अनेक बनावट बँक खाते असल्याचेही म्हटले जात आहे. बनावट कागदपत्रे देऊन तसेच अनेक वेळा चुकीची जन्मतारीख देऊन ही खाती उघडण्यात आली आहेत. तसेच हवालांच्या माध्यमातून सट्टेबाजीतून मिळालेली रक्कम या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या विदेश लोकांकडेही पाठवल्याची नोंद एफआरआयमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे.