‘क्रिकेटचा कुंभमेळा’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा झगमगता उद्घाटन सोहळा ७ एप्रिलला रंगणार आहे. या सोहळ्यामध्ये क्रिकेटवर अधिक भर दिला जाणार असला तरी बॉलीवूडच्या अव्वल तारेतारकांची अदाकारीही या वेळी पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांचा आयपीएलचा कलंकित इतिहास आणि कटू स्मृतींच्या पाश्र्वभूमीवर यंदा क्रिकेटच केंद्रस्थानी असेल, याची संयोजक काळजी घेत आहेत. ४७ दिवस चालणारा हा ‘इंडिया का त्योहार’ बुधवारपासून सुरू होणार असून पहिला सामना गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये ईडन गार्डन्सवर ८ एप्रिलला होणार आहे. मात्र मंगळवारी होणारा उद्घाटन सोहळा हा अविस्मरणीय व्हावा यासाठी बॉलीवूडचा सुपर स्टार हृतिक रोशन, शाहिद कपूर आणि अनुष्का शर्मा यांचे दमदार कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
आयपीएलमध्ये म्हणजे जगभरातील खेळाडूंचा मिलाप होतो. वर्षभर आपल्या देशांकडून खेळत असलेले हे खेळाडू आयपीएलमधील संघाच्या झेंडय़ाखाली एकत्र येतात. देशाचे नेतृत्व करताना आलेली कोणतीही कटुता आयपीएलमध्ये संपते आणि एकमेकांशी शत्रुत्व घेतलेले हे खेळाडू एका छताखाली गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. काही दिवसांपूर्वीचे उदाहरण द्यायचे झाले तर विश्वचषकादरम्यान एकमेकांशी आक्रमकपणे संवाद साधणारे शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर हे सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसतील.
पुढील वर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटचा विश्वचषक होणार असून त्यासाठी आयपीएल एक उत्तम सरावाची संधी असेल. तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, जिगरबाज अष्टपैलू युवराज सिंग, वेगवान गोलंदाज झहीर खान, सलामीवीर गौतम गंभीर, फिरकीपटू हरभजन सिंग हे भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी आयपीएल उत्तम संधी असल्याचे म्हटले जात आहे.