आयपीएलच्या ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे हा सामना आता पुण्यातच गहुंजे येथील मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे.
आयपीएल सामन्यांदरम्यान कित्येक लाख लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सध्या राज्य दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी ‘आयपीएल’ सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश देण्याची मागणी ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संघटनेने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तसेच परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला बीसीसीआय वा आयपीएलच्या कुठल्याही संघाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. उलट सामने इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्याने ३० एप्रिलनंतरचे सामने विशाखापट्टण्म येथे हलवले आहेत.
मात्र, २९ एप्रिल रोजी पुण्यात ‘सुपरजायंट्स पुणे’ आणि ‘गुजरात लायन’ यांच्यादरम्यान सामना होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १ मे रोजी पुण्यातील मैदानावरच ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत सामना हलवण्यासाठीची व्यवस्था करणे अशक्य आहे, असा दावा करत १ मे रोजीचा सामना पुण्यातच खेळू द्यावा, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे.