लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान ८ मे रोजी झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनौला अतिशय लाजिरवाणा असा पराभव दिला. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल मारली होती. मात्र हैदराबादच्या सलामी जोडीनं केवळ १० षटकात एकही विकेट न गमावता सामना खिशात घातला. ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेकने २८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका चांगलेच संतापले आणि त्यांची मैदानावरच केएल राहुलबरोबर बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लखनौने प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून १६६ धावंचे लक्ष्य दिले होते. कर्णधार के. एल. राहुल, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनस, कृणाल पंड्या यांना मोठी खेळी करता आली नाही, पण आयुश बदोनी आणि निकोलस पूरन यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूत ९९ धावांची भागीदारी केली. पूरनने २६ चेंडूत ४८ तर बदोनीने ३० चेंडूत ५५ धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १२ धावांत २ विकेट्स पटकावल्या.

हैदराबादचे सलामीवीर हेड आणि अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर त्यांनी लखनौच्या गोलंदाजावर जबर हल्ला चढविला. लखनौला डोके वर काढण्याची एकही संधी न देता, अवघ्या ५८ चेंडूत हैदराबादने १६६ धावांचे लक्ष्य गाठले. या लाजिरवाण्या पराभवामुळे लखनौ संघाचे मालक मात्र चांगलेच संतापले. सामना संपल्यानंतर मैदानातच ते केएल राहुलशी वाद घालताना दिसत होते. सोशल मीडियावर आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

SRH vs LSG: हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!

या व्हिडीओत संघाचे मालक गोयंका हे हातवारे करून केएल राहुलवर संतापून बोलत असल्याचे दिसत आहे. केएल राहुल मात्र शांतपणे त्यांचे म्हणणे एकून घेताना दिसत आहे. राहुल स्वतःला सांभाळून शांतपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे.

लखनौच्या पराभवामुळे आता गुणतालिकेत त्यांची घसरण होऊन ते सहाव्या स्थानावर आले आहेत. १२ सामन्यापैकी सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. यामुळे संघाला आता क्वालिफाय करणे कठीण झाले आहे. तर या विजयानंतर हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. १२ सामन्यात त्यांनी सात सामने जिंकून १४ गुण मिळविले आहेत.

गोयंका आणि केएल राहुलच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना समालोचकानेही नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारची गंभीर चर्चा ही बंद दाराआड व्हायला हवी. मैदानात इतके कॅमेरे लागलेले असतात, तुम्ही असे हातवारे करून बोलत असाल तर कुठल्यातरी कॅमेऱ्यात तुम्ही कैद होता. मात्र केएल राहुलने शांत राहून अतिशय चांगले उत्तर दिले आहे.