औरंगाबादेत रणजी खेळाडू मनीष गुड्डेवार व इतर बुकींना अटक झाल्याचे कळताच विदर्भातील क्रिकेट, तसेच सट्टा वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक बुकी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत दिल्ली पोलिसांनी तीन खेळाडूंसह बुकींना अटक केली तेव्हापासूनच नागपूरसह विदर्भातील अनेक सट्टा बुकी सावध झाले होते. मात्र, या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करीत असून त्याची धग इथपर्यंत पोहोचणार नाही, असे बुकी वर्तुळात समजले जात होते. किंबहुना, बुकींच्या संबंधातील काही वर्दीधाऱ्यांनीही तसा दिलासा दिला होता, असे बोलले जात होते. त्यामुळे ‘कुछ नही होता सब मॅनेज हो जायेगा’ अशी मनोमन समजूत करून घेऊन नागपूरसह विदर्भातील बुकी विश्व निर्धास्तपणे वावरत होते.
मात्र, याच्या अगदी विरुद्ध घडले. दिल्ली पोलिसांचे एक पथक काल रात्री उशिरा नागपुरात डेरेदाखल झाले. अगदी निवडक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची अगदी गुप्तपणे बैठक झाली. नागपूरसह विदर्भातील क्रिकेट खेळाडू व सट्टा बुकींची आदी माहिती घेण्यात आली. मोस्ट वॉँटेड खेळाडू व बुकींचा ठावठिकाणा रात्रीच शोधण्यात आला. हे काम सुरू असताना दिल्लीतील या प्रकरणाचे तपास पथक या पथकाच्या संपर्कात होते. संशयितांचा ठावठिकाणा मिळताच सकाळी हे पथक तातडीने विमानाने रवाना झाले. ही संपूर्ण कार्यवाही अत्यंत गुप्तपणे करण्यात आली. दुपारी औरंगाबादमध्ये खेळाडूसह इतरांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, यासंदर्भात कुणीच पोलीस अधिकारी बोलायला तयार नव्हते. सर्वानीच कानावर हात ठेवले. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, एवढेच ते उघडपणे सांगत होते.
नागपूरसह आणखी काही लहान-मोठे सट्टा बुकी आयपीएलमध्ये सक्रिय होते. मुंबई व दिल्लीच्या बडय़ा बुकींच्या संपर्कात आल्यामुळेच हे बुकी दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाच्या रडारवर आले. या बुकींसह आणखी काही खेळाडू या तपास पथकाच्या यादीत असून त्यांनाही लवकरच अटक होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. आज काही बुकींना अटक झाल्यानंतर नागपूरसह विदर्भातील बुकींचे धाबे दणाणले असून त्यापैकी अनेकजण बेपत्ता असल्याचे समजते. दरम्यान, क्रिकेटपटू मनीष गुड्डेवारला अटक झाल्याचे समजल्यानंतर क्रिकेट वर्तुळही हादरले. तो मूळचा गडचिरोलीचा असून २००३ मध्ये मध्य विभाग क्रिकेट स्पर्धेत विदर्भाकडून तो खेळला असल्याचे क्रिकेट वर्तुळातूून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2013 रोजी प्रकाशित
मनीषच्या अटकेनंतर विदर्भातील क्रिकेट व सट्टा वर्तुळ हादरले
औरंगाबादेत रणजी खेळाडू मनीष गुड्डेवार व इतर बुकींना अटक झाल्याचे कळताच विदर्भातील क्रिकेट, तसेच सट्टा वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक बुकी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
First published on: 20-05-2013 at 02:56 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After manish arrest vidharbha cricket and speculate circle trembled