Akash Singh Took Wicket Of Jos Buttler: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६४ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २३५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातला चांगली सुरूवात मिळाली होती. पण लखनऊच्या गोलंदाजांनी गुजरातला एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले.
गुजरात टायटन्स संघातील टॉप ३ फलंदाजांनी गुजरातला जवळपास सर्वच सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे. या सामन्यातही तिन्ही फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शुबमन गिल आणि साई सुदर्शनने ४६ धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन २१ धावांवर माघारी परतला.
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर, जोस बटलर गोलंदाजीला आला. ही जोडी मैदानावर असताना सहावे षटक टाकण्यासाठी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आकाश सिंग गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू गिलने मिड ऑफच्या दिशेने मारला. चेंडू वेगाने जात होता. त्यावेळी आकाश सिंगने हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू आकाश सिंगच्या हाताला लागला. आकाश सिंगच्या हाताला दुखापत झाली आणि त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याचं उर्वरित षटक आवेश खानने पूर्ण केलं.
हाताला दुखापत असतानाही मिळवली जोस बटलरची विकेट
तर झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून १० वे षटक टाकण्यासाठी आकाश सिंग गोलंदाजीला आला. उजव्या हाताला पट्टी बांधून तो पुन्हा एकदा गोलंदाजीला आला. ज्यावेळी तो गोलंदाजी करत होता त्यावेळी जोस बटलर स्ट्राईकवर होता. आकाश सिंग सिंगने राऊंड द विकेटचा मारा करत ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. हा चेंडू टप्पा पडताच आत आला आणि जोस बटलरची दांडी गुल करून गेला. हा चेंडू पाहून जोस बटलरलाही धक्का बसला.
गुजरातचा पराभव
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी २३६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातकडून कर्णधार शुबमन गिलने ३५ तर साई सुदर्शनने २१ धावांची खेळी केली. ही जोडी बाद होऊन माघारी परतल्यानंतर जोस बटलरने ३३ धावांची खेळी केली. शेवटी शेरफेन रुदरफोर्डने ३८ तर शाहरूख खानने ५७ धावांची खेळी केली. मात्र, गुजरातला २०२ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना लखनऊने ३३ धावांनी आपल्या नावावर केला.