आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघ आपला पहिला सामना 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यापूर्वी धोनीसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता पूर्णपणे तंदुरुस्त असून दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई संघात असणार आहे. मागील हंगामात, चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. गुणतालिकेत चेन्नईचा संघ सातव्या क्रमांकावर होता. गत सत्रात चेन्नईने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले होते.

या मोसमात चेन्नईसाठी रवींद्र जडेजाची तंदुरुस्ती महत्वाची आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला अद्याप एकही सामना खेळता आलेला नाही. पण आता तो पूर्णपणे फिट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जडेजा नेट्समध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करीत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जडेजा निश्चितपणे अंतिम अकरा संघाचा भाग असेल.

 

जडेजाची कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जडेजा हा चेन्नई सुपर किंग्जचा एक अनुभवी खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याने एकूण 184 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 2159 धावा केल्या आहेत. याशिवाय जडेजाने 114 बळीही आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे जडेजाचे फिट होणे, हे चेन्नईसाठी खूप महत्त्वाचे आहे. रवींद्र जडेजा आयपीएल 2008च्या पहिल्या सत्रापासून आयपीएल खेळत आहेत. 2020मध्ये जडेजाने सीएसकेसाठी चांगली फलंदाजी केली. त्याने मागील मोसमात 232 धावा केल्या.

मागील हंगामातील खराब कामगिरी विसरून या मोसमात चांगली कामगिरी करण्याचा चेन्नईचा मानस असेल. चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. कर्णधार धोनीच्या नेतृत्वात सीएसके संघाने 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. इतकेच नव्हे, तर सीएसकेचा संघ 8 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.