Amit Mishra Applies Saliva on the ball Video Viral : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात अटीतटीचा सामना झाला. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असतान लखनऊने बाजी मारली अन् सामना खिशात घातला. परंतु, आरसीबीची फलंदाजी सुरु असताना १२ व्या षटकात भन्नाट गोष्ट घडली. चौफेर फटकेबाजी करून अर्धशतक ठोकणारा विराट कोहली अमित मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण त्याच षटकात अमित मिश्राने चेंडूला थुंकी लावल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. आयपीएलमध्ये चेंडूला थुंकी लावून गोलंदाजी करणं योग्य आहे का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळं क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

कोविड १९ चा संसर्ग सुरु झाल्यानंतर आयसीसीने चेंडूला थुंकी लावण्यास बंदी घातली होती. आयपीएलमध्येही याबाबत सूचना दिल्या होत्या. आयपीएल २०२० मध्ये विराट कोहलीनेही असाच प्रकार केल्याचं उघडकीस आलं होतं. मिश्राने चेंडूला थुंकी लावण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला नाही. आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना मिश्राने चेंडूला थुंकी लावली होती. त्यानंतर अंपायर विरेंदर शर्माने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला वॉर्निंग दिली होती.

नक्की वाचा – सामन्यात झाली RCB ची परिस्थिती ‘गंभीर’ पण गौतमने बंगळुरुच्या चाहत्यांना दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन, Video होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

आयपीएल २०२३ च्या लिलावात अमित मिश्राला लखनऊ सुपर जायंट्सने ५० लाख रुपये देऊन खरेदी केलं. अमित मिश्राच्या अनुभवाच्या जोरावर लखनऊला सामने जिंकण्यास मदत होईल, याच हेतूने मिश्राला लखनऊच्या संघात घेण्यात आलं. आयपीएलच्या १५५ सामन्यांमध्ये मिश्राने १६८ विकेट्स घेतल्या आहेत. एकाच सामन्यात दोनवेळा चार विकेट्स आणि एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम मिश्राने आयपीएलमध्ये केला आहे. आयपीएलच्या इतिहासात ऑल टाईम विकेट टेकर्सच्या लिस्टमध्ये अमित मिश्रा चौथ्या स्थानावर आहे.