CSK vs GT Match Updates in Marathi: मुंबईकर आयुष म्हात्रेने आयपीएल सीझनमध्ये उशिरा येऊनही आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्स ताफ्यात सामील झाल्यापासून त्याने संघाला वादळी सुरूवात करून दिली आहे. गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यातही आयुषने अशीच वादळी फलंदाजी करत चांगली सुरूवात केली. पण आयुषची ही फटकेबाजी पाहून चाहत्यांना रोहित शर्माची आठवण आली.
१७ वर्षीय आयुष म्हात्रेने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह झटपट ३४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने सामन्यातील दुसऱ्या षटकात त्याने गुजरातचा गोलंदाज अरशद खानविरूद्ध विस्फोटक फलंदाजी केली. दुसऱ्या षटकात आयुषने २८ धावा कुटत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. गुजरात टायटन्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने यंदाच्या मोसमातील २३० धावांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली.
अरशद खानच्या षटकात आयुष म्हात्रेने ३ षटकार आणि २ चौकार लगावत २८ धावा केल्या. आयुष मोठी खेळी करण्याच्या तयारीत असतानाच प्रसिध कृष्णाने त्याला झेलबाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आयुष मिड ऑफला सिराजकरवी झेलबाद झाला.
म्हात्रेने आयपीएल २०२५ च्या मोहिमेचा शेवट सात सामन्यांत ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा करून केला, ज्यामध्ये त्यांचा सर्वोच्च धावसंख्या ९४ होती. सीएसकेच्या संघात ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागा आयुषला संघात स्थान मिळाले. आयपीएलमधील कामगिरीनंतर जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या आगामी बहु-फॉरमॅट दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.
अर्शद खानच्या गोलंदाजीविरूद्ध वादळी फटकेबाजी केल्यानंत चाहत्यांनी या युवा फलंदाजाचे कौतुक केले. आयुष म्हात्रेची फटकेबाजी पाहून चाहत्यांना रोहित शर्माची आठवण आली आणि त्याला मिनी रोहित शर्माही म्हणत आहेत. रोहित शर्मासारखी फटकेबाजी आयुष करत असल्याचे चाहते म्हणत आहेत.
आयुष म्हात्रे रोहित शर्माला आपला आदर्श मानतो. हिटमॅनची फलंदाजीने त्याला प्रभावित केल्याचं त्याने म्हटलं आहे. आयुष म्हात्रे देखील मुंबईकडून क्रिकेट खेळतो. मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात चेन्नईकडून आयुष म्हात्रेने आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले होते. यानंतर रोहित शर्मानेही सामन्यानंतर त्याचं कौतुक केलं.