IPL Matches Expansion : भारतात सध्या आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील निम्मे सामने जवळपास पूर्ण झाले आहेत. काही संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. तर काही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेला २२ एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यापूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धेत ८४ सामने खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र हा प्रस्ताव यशस्वी होऊ शकला नव्हता. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी ईएसक्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत घेऊन जाण्याच्या विचारात आहे.
मात्र हे दिसतं तितकं सोपं नसणार आहे. कारण सामन्यांची संख्या वाढणार म्हणजे स्पर्धेचा कालावधीही वाढणार. आयपीएल ही अशी एकमेव स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेत केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील स्टार खेळाडू खेळतात. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी स्पेशल विंडो मिळतो. जर सामन्यांची संख्या वाढणार असेल तर बीसीसीआयला आयसीसीकडून आणखी काही दिवस वाढवून घ्यावे लागतील. प्रत्येक संघाला प्रत्येक संघाविरुद्ध २ सामने खेळायला मिळायला हवे असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. एक सामना हा घरच्या मैदानावर असेल तर दुसरा सामना हा प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर असेल. त्यामुळे सामन्यांची संख्या ही ९४ वर जाऊन पोहोचेल.
सामन्यांची संख्या वाढवायची की नाही, याबाबत बीसीसीआयला ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करावी लागेल. जर एखादी स्पर्धा ३ महिन्यांहून अधिक काळ सुरू राहणार असेल, तर क्रिकेट चाहत्यांकडून या स्पर्धेला आधीसारखा प्रतिसाद येईल का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. यावेळी आयपीएल स्पर्धेला नवा विजेता मिळू शकतो. यावेळी पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे यापैकी कुठलातरी एक संघ यावेळी आयपीएलची ट्रॉफी उंचावू शकतो.