इंडियन प्रीमिअर लीग २०१८ ला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा खिताब जिंकण्यासाठी आठ संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत. ५१ दिवस हे आयपीएल सामने चालणार आहेत. दरम्यान आयपीएलला सुरुवात होताच सट्टाबाजारही गरम झाला आहे. सट्टा बाजारात प्रत्येक चेंडूवर तब्बल करोडो रुपयांची उलाढाल होत असते. आयपीएलच्या या हंगामातही सट्टाबाजार जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे सट्टाबाजाराने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावेळी विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्स संघाला सर्वात कमी भाव मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आससीबीवर ४.७० रुपयांचा भाव सुरु आहे, तर राजस्थान रॉयल्सचा भाव ९.५ रुपये आहे. बंगळुरुनंतर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर ५.२ रुपयांचा भाव सुरु आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या सनरायजर्स हैदराबादवर ६.४० रुपयांचा भाव असून, सट्टेबाजांच्या यादीत त्यांचा तिसरा क्रमांक आहे. दिनेश कार्तिक कर्णधार असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सवर ७.५० रुपयांचा भाव असून, धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर ७ रुपयांचा भाव सुरु आहे.

यानंतर ८ रुपयांसहित दिल्ली डेअरडेव्हिल्सचा क्रमांक आहे. गौतम गंभीर दिल्लीचं कर्णधारपद सांभाळत आहे. याशिवाय अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब सातव्या क्रमांकावर असून त्यांचा भाव ८.६० रुपये आहे.

पंजाब आणि दिल्लीने जवळपास आपले संघ पुर्णपणे बदलले आहेत. तर दुसरीकडे, चेन्नई, राजस्थान आणि मुंबईने आपल्या अनेक जुन्या खेळाडूंना सोबत ठेवण्यात यश मिळवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघाने दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलं आहे. दोन्ही संघांवर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या दोन संघावर बंदी घालण्यात आल्याने गुजरात लायन्स आणि पुणे सुपरजायंट्सला आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला होता.