आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४० वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघांमध्ये खेळण्यात येणार आहे. गेल्या तीन दुसऱ्यांदा हे संघ आमनेसामने असणार आहेत. इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा ६ गडी राखून सहज पराभव केला होता. आता स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थानला या सामान्यासह प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे.

मात्र, आजच्या सामन्यात सगळ्यांची नजर असेल ती विंडीजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल याच्यावर. ख्रिस गेल सध्या एका मोठ्या विक्रमाच्या अगदी जवळ आहे. आज जर गेलने आपल्या फलंदाजीचा झंझावात सुरु ठेवला, तर आयपीएलमधील एक मोठा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. अद्याप कोणत्याही फलंदाजाला न जमलेला विक्रम करण्याची संधी गेलला आहे.

ख्रिस गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना १०७ सामन्यांमध्ये १०६ डावात ३ हजार ९३६ धावा केल्या आहेत. गेलला ४ हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी केवळ ६४ धावांची गरज आहे. जर आज गेलने ४ हजार धावांचा टप्पा गाठला, तर ही कामगिरी करणारा गेल आयपीएलमधील ७वा आणि विदेशी खेळाडूंमध्ये दुसरा फलंदाज ठरेल. ही कामगिरी वरवर पाहता साधी वाटत असली तरीही यात एक विशेष बाब आहे. ती म्हणजे तसे झाल्यास सर्वात कमी डावात ४ हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होईल. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड व्हॉर्नर याच्या नावावर आहे. त्याने ११४ डावात ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

गेलने आतापर्यंत फक्त १०६ डाव खेळून ३ हजार ९३६ धावा केल्या आहेत. जरी गेल ६४ धावा करण्यासाठी पुढील ७ डाव खेळला, तरीही तो विक्रम गेलच्या नावे होईल. दरम्यान, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही ४ हजार धावांच्या टप्प्याजवळ आहे. त्याच्या १६९ डावात ३ हजार ९२१ धावा आहेत.

४ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज :

१. विराट कोहली – ४ हजार ८१४
२. सुरेश रैना – ४ हजार ८०१
३. रोहित शर्मा – ४ हजार ४३८
४. गौतम गंभीर – ४ हजार २१७
५. रॉबिन उथप्पा – ४ हजार ०३७
६. डेव्हिड व्हॉर्नर – ४ हजार ०१४