बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर यंदाच्या आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की ओढवली. तो सामना बंगळुरूने १० गडी राखून जिंकला. या पराभवाबरोबरच पंजाबचा सलग तिसरा पराभव झाला. त्यामुळे या संघाच्या निवडकर्त्यांवर टीकेची झोड उठली. मात्र त्याआधीच दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने निवड समितीवर नाराजी व्यक्त करत त्यांना तिरकस सवाल केला.
पंजाब बंगळुरूकडून पराभूत होण्याआधी राजस्थान आणि कोलकाता या दोघांनी पंजाबला नमवले. त्यानंतर डेल स्टेनने ट्विटरवरून पंजाबच्या संघाला आणि निवडकर्त्यांना एक खोचक सवाल विचारला. स्टेन म्हणाला की पांजाबच्या संघात आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याचा समावेश का करण्यात आलेला नाही? या प्रश्नाच्या माध्यमातून त्याने निवडकर्त्यांवर सडकून टीका केली. तसेच, मिलर माझा मित्र आहे, त्या नात्याने मी हा प्रश्न विचारत आहे, असेही त्याने ट्विट केले आहे.
So why isn’t Miller getting a game? #justaskingforafriend
— Dale Steyn (@DaleSteyn62) May 14, 2018
पंजाबच्या संघाकडून खेळताना गेल्या काही हंगामात मिलरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र या हंगामात त्याला केवळ २ सामने खेळायची संधी मिळाली. त्यात त्याने ५० धावा केल्या. पंजबाचा फिरकीपटू मुजीब जायबंदी झाल्यावर त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोयनीसला संधी देण्यात आले. त्यावेळीही मिलरला वगळण्यात आले.
आता डेल स्टेनने हा सवाल उपस्थित केल्यानंतर निवडकर्ते आता तरी मिलरला संधी देतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
