सातत्यपूर्ण विजयाचा सुरुवातीला लौकिक राखल्यानंतर कामगिरीतील सातत्य बिघडलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आणि सलग पराभवांनंतर विजयामध्ये सातत्य राखणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ ब्रेबॉर्न स्टेयिडमवर दोन हात करण्यासाठी सज्ज असतील.
पहिल्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतरच्या पाच सामन्यांमध्ये फक्त दोन सामनेच जिंकता आले आहेत. गेल्या सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध आठ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. अजिंक्य रहाणे संघाच्या फलंदाजीचा कणा असला तरी त्याला पहिल्या काही सामन्यांनंतर छाप पाडता आलेली नाही. कर्णधार शेन वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांनाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. गेल्या सामन्यात संजू सॅमसनने झुंजार फलंदाजीचा नमुना पेश केला होता, त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यात अपेक्षा उंचावल्या असतील. दीपक हुडाला फार कमी संधी देण्यात आल्या आहेत. राजस्थानचे पहिले तीन फलंदाज बाद झाल्यावर त्यांना विजय मिळवणे फारसे सोपे दिसत नाही. गोलंदाजीमध्ये धवल कुलकर्णी सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला यश मिळवून देत आहे.
दिल्लीचा संघ सुरुवातीला बलाढय़ वाटत नसला तरी सध्याच्या घडीला संयतपणे ते चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरने हा मोसम चांगलाच गाजवला आहे. त्याला कर्णधार जे. पी. डय़ुमिनीची चांगली साथ मिळत आहे. मयांक अगरवालही चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण युवराज सिंगला मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही. दिल्लीला गोलंदाजीची समस्या भेडसावत असली तरी गेल्या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानने दमदार पदार्पण केले आहे. त्याचबरोबर नॅथन कल्टर निल चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याचबरोबर इम्रान ताहीर आणि अमित मिश्रा यांनीही चांगली गोलंदाजी केली आहे.

वेळ : रात्री ८.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.