मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर मात केल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा आत्मविश्वास उंचावला आहे. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला गहुंजे येथे बुधवारी पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
किंग्ज इलेव्हनला येथे पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात सर्वच आघाडय़ांवर त्यांची निराशाजनक कामगिरी झाली होती, मात्र त्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्स संघावर मात केल्यानंतर त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. राजस्थानविरुद्ध नुकताच पराभव पत्करणाऱ्या दिल्ली संघास विजयाची बोहनी करण्यासाठी किंग्ज संघाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पंजाब संघात ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, मुरली विजय व वीरेंद्र सेहवाग यांच्याकडून फलंदाजीत मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबरच वृद्धिमान साहा, मनन व्होरा, अक्षर पटेल यांच्यावरही त्यांची भिस्त आहे. गोलंदाजीत मिचेल जॉन्सन हे त्यांचे प्रभावी अस्त्र मानले जात आहे. त्याला संदीप शर्मा, अनुरीत सिंग, परविंदर अवाना यांचीही साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.
झहीर खान व महम्मद शमी हे दुखापतीमधून अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नसले तरी त्यांच्या अनुपस्थितीत इम्रान ताहीर व अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांनी दिल्ली संघाच्या गोलंदाजीची बाजू समर्थपणे सांभाळली आहे. फलंदाजीत युवराज सिंग, अँजेलो मॅथ्यूज, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, केदार जाधव, अॅल्बी मॉर्केल, कर्णधार जे. पी. डय़ुमिनी यांच्याकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दिल्ली संघाला या स्पर्धेत गेल्या अकरा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. किंग्ज इलेव्हनविरुद्ध त्यांची कामगिरी फारशी चांगली नाही. १४ सामन्यांपैकी नऊ सामने किंग्ज संघाने जिंकले आहेत, तर पाच सामन्यांमध्ये दिल्ली संघास विजय मिळाला आहे.
सामन्यावर पावसाचे सावट : दिल्ली विरुद्ध पंजाब या सामन्यात युवराज, डय़ुमिनी, सेहवाग यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा येथे चाहते करीत असले, तरी या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. गेले दोन दिवस येथे ढगाळ हवामान आहे. बुधवारी पावसाच्या सरी येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स – जेपी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, मयांक अगरवाल, श्रीकर भरत, नॅथन कोल्टिअर नील, डॉमिनिक जोसेफ, चिदंबरम गौतम, ट्रॅव्हिस हेड, इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, केके जियास, झहीर खान, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, अल्बी मॉर्केल, शाहबाद नदीम, गुरिंदर संधू, मार्कस स्टोनिअस, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत, जयंत यादव.
किंग्स इलेव्हन पंजाब – जॉर्ज बेली (कर्णधार), अनुरीत सिंग, परविंदर अवाना, रिशी धवन, योगेश गोळवलकर, गुरकीरत सिंग मान, ब्युआन हेन्ड्रिंक्स, मिचेल जॉन्सन, करनवीर सिंग, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, निखील नाईक, अक्षर पटेल, थिसारा परेरा, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.