Why Dewald Brewis Did Not Take Review After LBW IPL 2025: आरसीबीने चेन्नईचा २ विकेट्सने पराभव करत आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका सीझनमध्ये दोन वेळा मात करण्यात यश मिळवलं. या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट सांघिक खेळीच्या जोरावर हा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात यश दयालने अखेरच्या षटकात १५ धावांचा यशस्वीरित्या बचाव केला. पण यादरम्यान डेवाल्ड ब्रेविसबरोबर अनोखी घटना पाहायला मिळाली.

आयुष म्हात्रे आणि रवींद्र जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नईचा संघ सामन्यात कायम होता. आयुष म्हात्रे उत्कृष्ट खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजीची वेळोवेळी शाळा घेत होता. पण १७व्या षटकात लुंगी एनिगिडीने त्याला ९४ धावांवर झेलबाद केलं. यानंतर डेवाल्ड ब्रेविस फलंदाजीला आला, पण येताच तो पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. लुंगी एनिगिडीला सलग दुसरी विकेट मिळाली. पंचांनीही त्याला बाद घोषित केलं. पण ब्रेविसला रिव्ह्यू घेण्याची संधी नाही मिळाली. डेवाल्ड ब्रेविसच्या या प्रकरणावरून चाहते पंचांच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

एलबीडब्ल्यू बाद दिल्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस रिव्ह्यू घेऊ शकला नाही. लुंगी एनगिडीचा फुल-टॉस चेंडू ब्रेव्हिसच्या मागच्या पायाला लागला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केल्यानंतर ब्रेविस रिव्ह्यू घेऊ शकला नाही. १५ सेकंद संपल्यामुळे पंचांनी ब्रेविसला रिव्ह्यू घेण्याची परवानगी दिली नाही.

डेवाल्ड ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून एक चूक झाली की मैदानावरील पंचांवनी बाद झाल्याचा इशारा केल्यानंतर धाव घेत राहिले. नियमानुसार, एकदा एलबीडब्ल्यू बाद दिल्यानंतर चेंडू डेड होतो. पण चेंडू लांब गेल्याने दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात १५ सेकंद वाया गेले आणि ब्रेविस रिव्ह्ययू घेऊ शकला नाही. हे दोघेही धाव घेऊन झाल्यानंतर विकेटबाबत चर्चा करत राहिले आणि मग रिव्ह्यूची मागणी केली.

विकेटच्या चर्चेदरम्यान एक मोठी घटना अशी घडली की, यावेळी स्क्रीनवरही टायमर दिसत नव्हता. चर्चा केल्यानंतर जेव्हा ब्रेविसने रिव्ह्यूची मागणी केली, तेव्हा आरसीबीच्या खेळाडू वेळेबाबत आठवण करून दिली. तर पंचांनीही त्याला वेळ संपल्याने रिव्ह्यू घेऊ शकत नसल्याचे म्हटले. पण जडेजाने पंचांशी चर्चा केली, टायमर दिसत नसल्याचेही सांगितले. जर ब्रेविसने वेळेत रिव्ह्यू घेतला असता तर तो वाचला असता. कारण चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर होता.

आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर ब्रेविस क्रीजवर आला होता पण येताच तो माघारी परतला. ब्रेविस चांगल्या फॉर्मात होता, तर तो मैदानावर टिकला असता तर नक्कीच संघाला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावली असती. पण २ चेंडूत २ विकेट पडल्याने सामना फिरला. जर ब्रेविसने वेळेवर रिव्ह्यू घेतला असता आणि क्रीजवर राहिला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता.

आरसीबीने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून २११ धावा केल्या. रवींद्र जडेजा ४५ चेंडूत ७७ धावा करत नाबाद राहिला. महेंद्रसिंग धोनीने ८ चेंडूत १२ धावा केल्या. शिवम दुबे ८ धावा करून नाबाद राहिला. चेन्नईला २ षटकांत २९ धावा करता आल्या नाही आणि परिणामी संघाला २ धावांनी पराभव पत्करावा लागला.