राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळत असताना संजू सॅमसनने शारजाच्या मैदानावर धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा भारतीय संघात सॅमसनला डावलून पंतला संधी देण्याबाबतचा मुद्दा चर्चेला आला आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संजूचं कौतुक करताना निवड समितीला टोला लगावला आहे.

संजू हा भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज नसून तो आताच्या घडीचा सर्वोत्तम तरुण फलंदाज आहे. कोणाला यावर चर्चा करायची आहे?? बाकीचे सर्व संघ संजूला स्थान देण्यासाठी उत्सुक असतात…फक्त भारतीय संघात अंतिम ११ जणांमध्ये त्याला स्थान मिळत नाही हे थोडं आश्चर्यकारक असल्याचं गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणाऱ्या मुंबईकर यशस्वी जैस्वालला स्वस्तात माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने चेन्नईच्या गोलंदाजीची धुलाई केली. दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत दोन्ही फलंदाजांनी राजस्थानला सुस्थितीत आणलं. सॅमसनने १९ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. विशेषकरुन पियुष चावलावर दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल केला. एन्गिडीने सॅमसनला बाद करुन राजस्थानची जोडी फोडली.