Gujarat Titans Beat Mumbai Indians IPL 2025: गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना दोन वेळा थांबून उशिरा सुरू झाला. त्यामुळे १९ षटकांचा सामना खेळवण्यात आला. गुजरातला विजयासाठी ६ चेंडूत १५ धावांची गरज होती. दीपक चहर गोलंदाजी करत होता तर राहुल तेवतिया आणि गेराल्ड कुत्सिया फलंदाजी करत होते. चहरच्या पहिल्या चेंडूवर तेवतियाने चौकार लगावला आणि मुंबईला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला. तिसऱ्या चेंडूवर कुत्सियाने षटकार लगावला. चौथ्या चेंडू नो बॉल टाकल्याने फ्री हिट होती. चौथ्या चेंडूवर तेवतियाने १ धाव घेतली. पाचव्या चेंडूवर कुत्सिया झेलबाद झाला. सहाव्या चेंडूवर १ धावेची गरज असताना अरशदने चेंडू समोरच्या दिशेने टोलवला, पण हार्दिक थेट स्टम्प्सवर चेंडू मारायला चुकला आणि गुजरातने ३ विकेट्सने विजय मिळवला.

मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात खराब झाली. साई सुदर्शन पहिल्याच षटकात झेलबाद झाला. यासह पॉवरप्लेमध्ये गुजरातने २९ धावाच केल्या. पण नंतर बटलर आणि गिलने ७० अधिक धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने यादरम्यान १० चेंडूंचं षटक टाकत १८ धावा दिल्या. त्यानंतर तिलक वर्माने शुबमन गिलने झेलही सोडला. पण पुढच्याच चेंडूवर अश्वनी कुमारने बटलरला बाद करत ती भागीदारी तोडली.

अश्वनी कुमार हा कार्बिन बॉशच्या जागी कनक्शन सबस्टीट्यूट म्हणून मैदानात आला. कार्बिन बॉशला अखेरच्या षटकात दोन षटकार लगावल्यावर प्रसिद्ध कृष्णाचा बाऊन्सर थेट त्याच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे तो दुसऱ्या डावात उतरला नाही आणि त्याच्या जागी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून अश्वनी कुमारला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अश्वनीने या सामन्यात महत्त्वाची विकेट घेत मुंबईला सामन्यात कायम ठेवलं.

यानंतर रूदरफोर्ड आणि गिलने यानंतर संघाचा डाव सावरत डीएलएसप्रमाणे सामन्यात एक पाऊल पुढे राहिले. अखेरीस १४ षटकांनंतर पावसामुळे सामना थांबला. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. दरम्यान १५वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला आणि त्याने गिलला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पुढच्या षटकात बोल्टने रूदरफोर्डला LBW बाद केले. पुन्हा बुमराह १७वे षटक आणण्यासाठी आला आणि त्याने शाहरूख खानला क्लीन बोल्ड करत सामना फिरवला. यानंतर १८वे षटक टाकण्याची जबाबदारी अश्वनी कुमारला दिली आणि त्याने राशिद खानला चकित करत LBW बाद केलं. १८व्या षटकानंतर सामना परत सुरू झाला आणि ६ चेंडूत १५ धावा करत गुजरातने सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावली आणि संघ प्रथम फलंदाजीला उतरला. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन लवकर बाद झाले. पण सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्सने मुंबईचा डाव सावरला. विल जॅक्स आणि सूर्याने ४३ चेंडूत ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विल जॅक्स ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा करत बाद झाला.

सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत चौकारांसह ३५ धावांची खेळी केली. तर कार्बिन बॉशने २२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या, तर दीपक चहरने ८ धावा केल्या. याशिवाय मुंबईचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. पण तरीही मुंबईने ८ बाद १५५ धावा केल्या. गुजरात टायटन्सच्या सर्व गोलंदाजांनी या सामन्यात विकेट घेतली. सिराज, अरशद खान, प्रसिद्ध कृष्णा, राशिद खान, गेराल्ड कुत्सिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या.