कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी देशातील इतर चार शहरांमध्ये हे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. त्यासाठी ती चार शहरेही निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. यामध्ये विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, पुणे आणि राजकोट या शहरांचा समावेश आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही.
#Chennai's loss may be #Pune's gain.
IPL Chairman Rajiv Shukla hints Pune might be the new host of the matches that are moved out of Chennai. #IPL2018 #CauveryProtest
Read @ANI story | https://t.co/yrcs2umaeQ pic.twitter.com/aPjnr4yod6
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2018
आयपीएलच्या प्रशासक समितीचे विनोद राय या वृत्ताला दुजोरा देताना म्हणाले की, ‘चेन्नईत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला सामन्यांसाठी इतर ठिकाणांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यासाठी चार ठिकाणांचा पर्याय बीसीसीआयने तयार ठेवला असून यामध्ये विशाखापट्टम, त्रिवेंद्रम, पुणे आणि राजकोट या शहरांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्ज त्यांचे सामने या शहरांमध्ये खेळू शकते.’
कावेरी पाणीवाटपावरुन सध्या तामिळनाडूत राजकारण चांगलेच तापलेले आहे. अनेक राजकीय पक्षांनी आयपीएलच्या सामन्यांना विरोध दर्शवला आहे. काल चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याआधीही अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाबाहेर निदर्शने केली होती. त्याचसोबत सामना सुरु असताना तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्याने चेन्नईच्या संघातील खेळाडूच्या दिशेने बूट फेकून मारला होता. त्यामुळे ही सर्व कारणे लक्षात घेता, चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचे होणारे सामने बाहेरच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला नवीन हंगामात यामुळे धक्का बसला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईसाठी यंदाच्या हंगामात चेपॉकच्या मैदानात होणारे सामने अतिशय महत्वाचे मानले जात होते. त्याप्रमाणे कोलकात्याविरोधातला आपला पहिला सामना जिंकत चेन्नईने नवीन हंगामात विजयासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र आता चेन्नईतून यंदाच्या हंगामासाठी आयपीएल हद्दपार झाल्यामुळे संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.