राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार पंजाब-हैदराबाद लढत

हैदराबाद : धडाकेबाज फलंदाजी विरुद्ध वैविध्यपूर्ण गोलंदाजी अशी खास मेजवानी इंडियन प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या हैदराबादचे या सामन्यात ख्रिस गेल नावाच्या वादळाला रोखून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचे ध्येय असेल.

मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ११८ धावांच्या लक्ष्याचा सहजपणे बचाव करणाऱ्या हैदराबादला स्पर्धेतील सर्वात समतोल संघ म्हणून ओळखले जाते. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीतही सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजयी केले. फिरकी गोलंदाज रशिद खानचे चेंडू खेळणे अजूनही फलंदाजांना कठीण जात आहे. मात्र, गेलने रशिदला एकाच षटकात चार षटकार ठोकून त्याच्या गोलंदाजीची पिसे काढली होती हे विसरून चालणार नाही. डावखुरा शाकिब-अल-हसनसुद्धा उपयुक्त मारा करून धावसंख्येला लगाम घालू शकतो.

फलंदाजीत कर्णधार केन विल्यम्सन कारकिर्दीच्या सवरेत्कृष्ट फॉर्मात असून सहा सामन्यात एकूण २५९ धावांसह तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. मात्र त्याच्या व्यतिरिक्त मनीष पांडे, युसुफ पठाण, दीपक हुडा यांना फलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही. दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या शिखर धवनकडून संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल.

दुसरीकडे हैदराबादला स्पर्धेतील पहिल्या पराभवाचे तोंड पाहावयास लावणाऱ्या पंजाबचा संघ सर्वाना धक्का देत गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. रविचंद्रन अश्विनच्या कर्णधारपदाखाली अप्रतिम कामगिरी करत पंजाबने सहा सामन्यातून पाच विजय मिळवले आहेत. या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांची जोडी भन्नाट फलंदाजी करत आहे. विशेषत: याआधीच्या हैदराबादविरुद्धच्याच सामन्यात गेलने ६३ चेंडूत १०४ धावांची तुफानी खेळी केली होती. दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात गेलने दुखापतीमुळे माघार घेतली होती, त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

याशिवाय करुण नायर, मयांक अगरवाल, आरोन फिंच आणि युवराज सिंग असे फलंदाज पंजाबच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत अश्विनच्या नेतृत्वाखाली अ‍ॅण्ड्रय़ू टाय, मुझीब-उर-रहमान हे आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पडत आहेत.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.