आयपीएलच्या तेराव्या हंगामात ४९ सामन्यांनंतर अखेरीस पहिल्या संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. दुबईच्या मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. चेन्नईने मिळवलेल्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचं काम सोपं होऊन ते १६ गुणांनिशी प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय ठरले आहेत. RCB विरुद्ध सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या खात्यात ६ गुण जमा झाले होते. परंतू जर-तर ची शक्यता आणि इतर समीकरणांमुळे त्यांचं प्ले-ऑफचं स्थान पक्क झालं नव्हतं.
MI officially becomes the first team to make it to the playoffs in #IPL2020
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) October 29, 2020
चौथ्या स्थानासाठी कोलकाता, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थान या संघांमध्ये शर्यत असताना चेन्नईने कोलकात्यावर मात करणं मुंबईसाठी फायदेशीर ठरणार होतं आणि नेमकं झालंही असतं. ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली आणि मुंबईला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं. सध्याच्या घडीला मुंबईचा संघ १६ गुण आणि + १. १८६ अशा स्ट्राँग रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या हंगामात मुंबईचे साखळी फेरीतले दोन सामने शिल्लक असून त्यांना यापुढील सामन्यात दिल्ली आणि हैदराबादचा सामना करायचा आहे.
