बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. नाणेफेकीच्या वेळी नशिबाने राहुलची साथ दिली नाही. पण फलंदाजीत मात्र राहुलला नशिबाने पुरेपूर साथ दिली. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला २०७ धावांचे तगडे आव्हान दिले.

विराट कोहलीने लोकेश राहुलला दोन वेळा झेल सोडला आणि ते दोन झेल विराटच्या चांगलेच महागात पडले. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याचसोबत राहुलची आजची वैयक्तिक धावसंख्या ही IPLच्या इतिहासातील कर्णधाराने झळकावलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०१७च्या IPLमध्ये डेव्हिड वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपद भूषवताना ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. कोलकाताविरोधात त्याने हा पराक्रम केला होता. त्यानंतर आज राहुलने तो विक्रम मोडला.

दरम्यान, पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल मैदानावर आला आणि पहिल्याच षटकात राहुलने दमदार पराक्रम केला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने त्याला पायाजवळ चेंडू टाकला. तो चेंडू त्याने मागच्या दिशेने टोलवत चौकार मिळवला. या चौकारासह त्याने IPL कारकिर्दीत २ हजार धावांचा टप्पा गाठला. IPL २००० धावा करणारा राहुल ३२वा फलंदाज ठरला. राहुलने ६९ सामने आणि ६० डावांत हा पराक्रम केला.