राजस्थान रॉयल्सची इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मोहीम पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्यांच्या भारतीय खेळाडूंना खेळ उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे. समतोल आणि बलाढय़ गणल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सशी मंगळवारी होणाऱ्या लढतीत जयदेव उनाडकट आणि रयान परागला डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
फलंदाजीचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या शारजात राजस्थानने यंदाच्या हंगामात झोकात प्रारंभ केला. परंतु दुबई आणि अबू धाबीच्या आकाराने मोठय़ा मैदानांवर त्यांची कामगिरी ढासळली. चार सामने खेळणाऱ्या राजस्थानच्या खात्यावर दोन विजयांसह चार गुण जमा आहेत.
राजस्थानला आता प्रतीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत विलगीकरणात असणाऱ्या बेन स्टोक्सची आहे. जोस बटलरची (३ सामन्यांत ४७ धावा) फलंदाजी, उनाडकटची (४ सामन्यांत १ बळी) गोलंदाजी ही राजस्थानच्या अपयशाची प्रमुख कारणे आहे. युवा परागसुद्धा प्रभाव दाखवू शकलेला नाही. कर्णधार स्टीव्ह स्मिथ परागच्या जागी युवा यशस्वी जैस्वालला संधी देण्याची दाट शक्यता आहे. टॉम करन आणि जोफ्रा आर्चर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध उनाडकटऐवजी अनुभवी वरुण आरोन किंवा युवा कार्तिक त्यागीला संधी मिळू शकेल.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने मागील दोन सामन्यांत आपला खेळ कमालीचा उंचावला आहे. पाच सामन्यांतील तीन विजयांसह सहा गुणांवर असलेल्या मुंबईने सरस धावगतीच्या बळावर गुणतालिके त अग्रस्थान मिळवले आहे. ‘सुपर ओव्हर’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून जिव्हारी लागणारा पराभव पत्करल्यानंतर मुंबईच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला आहे. मुंबईने मागील दोन सामन्यांत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांना अनुक्र मे ४८ आणि ३४ धावांनी पराभूत केले.
मुंबईच्या मोहिमेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच आघाडय़ांवर कामगिरी उत्तम होत आहे. कर्णधार रोहित शर्मा (१७६ धावा) सातत्याने धावा करीत असून, क्विंटन डीकॉकलाही आता सूर गवसला आहे. याशिवाय किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि हार्दिक पंडय़ा दमदार फटके बाजी करून आपली भूमिका चोख बजावत आहेत. मागील सामन्यांत हार्दिकचा भाऊ कृणालनेही विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्याला बदली खेळाडू म्हणून मुंबईच्या संघात स्थान मिळवणाऱ्या जेम्स पॅटिन्सनची (७ बळी) पूरक साथ मिळत आहे.
* सामन्याची वेळ : सायं.७.३०वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या