कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला पराभवाची चव चाखायला लावली. महिपाल लोमरोरच्या झुंजार खेळीमुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने ८ गडी आणि ५ चेंडू राखत राजस्थानवर सहज विजय मिळवला. विराटव्यतिरिक्त देवदत्त पडीकलनेही ६३ धावांची दमदार खेळी केली. गोलंदाजीत युजवेंद्र चहलने चमक दाखवत ३ बळी टिपले. या विजयासह बंगळुरूने गुणतक्त्यात अव्वलस्थानी झेप घेतली.

राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ उदानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बटलरही (२२) बाद झाला. पाठोपाठ संजू सॅमसनही ४ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि महिमाल लोमरोर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उथप्पा १७ धावांवर माघारी परतला. पण महिपाल लोमरोरने एक बाजू लावून धरत उत्तम कामगिरी केली. त्याने ३९ चेंडूत ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. तर राहुल तेवातियाने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत १२ चेंडूत ३ षटकारांसह २४ धावा केल्या. परंतु युजवेंद्र चहलने सर्वाधिक ३ बळी टिपले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा सलामीवीर फिंच ८ धावांत माघारी परतला. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांनी ९९ धावांची भागीदारी केली. दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केल्यावर पडीकल बाद झाला. त्याने ४५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ६३ धावा केल्या. विराटने मात्र शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या बळावर ५३ चेंडूत ७२ धावा केल्या. आर्चर आणि श्रेयस गोपालला १-१ बळी मिळाला.