चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली. रैनाच्या परिवारातील सदस्याला पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. अशावेळी आपल्या परिवारासोबत असणं अधिक गरजेचं असल्याचं वाटल्यामुळे रैना भारतात परतला. CSK ने अद्याप रैनाच्या ऐवजी संघात बदली खेळाडूला जागा दिलेली नाही. रैना यंदाच्या हंगामात पुनरागमन करेल अशीही चर्चा सुरु होती. रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसच्या मते अंबाती रायुडूला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळायला हवी.

“माझं मत विचाराल तर मी तिसऱ्या क्रमांकावर रायुडूला संधी देईन. रैनाची अनुपस्थिती चेन्नई सुपरकिंग्जला जाणवणार यात काही शंकाच नाही. रैनासारख्या भरवशाच्या खेळाडूला पर्याय सापडणं सोपं नाहीये. चेन्नईच्या संघात खूप चांगले खेळाडू आहेत. पण संघात रैनाची जागा कोण घेईल हे शोधणं चेन्नईसाठी खूप कठीण जाणार आहे.” स्टायरिस Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

दरम्यान, आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ नेमकी बाजी मारतो आणि चेन्नईला तिसऱ्या क्रमांकावर योग्य पर्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – IPL 2020 : दिपक चहरला BCCI कडून सरावाची परवानगी