यंदाच्या आयपीएलच्या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मंगळवारी पंजाब किंग्जला राजस्थानविरुद्ध शेवटच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंजाब किंग्जच्या एकूणच धोरणाविषयी आणि गेम प्लॅनविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनं त्याच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली आहे. पंजाब किंग्जच्या गेम प्लॅनवर सेहवागनं आश्चर्य व्यक्त करतानाच टीका देखील केली आहे. तसेच, पंजाबला आपला बॉलिंग अटॅक अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं देखील सेहवाग म्हणाला आहे.
बुधवारी पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत झाला. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पंजाबचा संघ १८२ धावांवरच आटोपला आणि अवघ्या २ धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विरेंद्र सेहवागनं पंजाब किंग्जच्या खेळाडू बदलावर भाष्य केलं आहे. “बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत, जितक्या वेळा पंजाब किंग्ज त्यांच्या संघातले खेळाडू बदलतात”, असं सेहवाग म्हणाला आहे.
RR vs PBKS : रंगतदार सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, शेवटच्या षटकात फिरला सामना
“पंजाब किंग्जचे सामन्यासाठीचे अंतिम ११ खेळाडू कोणते असतील, याचा अंदाज बांधणं फारच कठीण आहे. कारण पहिल्या ७ सामन्यांमध्ये त्यांनी त्यांची गोलंदाजांची फळी इतक्या वेळा बदलली आहे की त्याला सुमारच नाही. ते कसा खेळ करतात आणि कुणासोबत खेळतात हे पंजाब किंग्जसाठी मोठं आव्हान ठरणार आहे”, असा इशारा देखील सेहवागनं दिला आहे.
बॉलिंगवर काम करणं आवश्यक
दरम्यान, सेहवागनं पंजाब किंग्जला आपला बॉलिंग अटॅक जास्त मजबूत करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. “ख्रिस गेल, निकोलस पूरन, मयांक अगरवाल आणि के. एल. राहुल हे संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. पण पंजाबला जर कुठल्या बाजूवर काम करावं लागणार आहे, तर ते बॉलिंग आहे. त्यासाठी ख्रिस जॉर्डन हा एक असा परदेशी खेळाडू आहे, जो फलंदाज म्हणून धावा देखील काढू शकतो आणि गोलंदाज म्हणून शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स देखील घेऊ शकतो”, असं विरेंद्र सेहवागनं नमूद केलं आहे.