आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सातवा सामना आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जातोय. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना होतोय. हा सामना चांगलाच अटीतटीचा होत असून चेन्नई सुपर किंग्जच्या रॉबिन उथप्पाने दिमाखदार खेळ करुन दाखवलाय. त्याला या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. या संधीचं त्याने सोनं करुन दाखवलं असून लखनऊविरोधातील या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळ केलाय.
रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वातील चेन्नईने आजच्या सामन्यात रॉबिन उथप्पाला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली. या संधीचा त्याने चांगलाच फायदा करुन घेतला. त्याने आजच्या सामन्यात २७ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ५० धावा केल्या आहेत. या ५० धावांच्या जोरावरच चेन्नईने लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर उभा केला. उथप्पासोबत आलेला ऋतुराज गायकवाड मात्र चांगली कामगिरी करु शकला नाही. तो अवघी एक धाव करुन धावचीत झाला.
याआधी कोलकाताविरोधात झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळीदेखील त्याने २१ चेंडूंमध्ये २८ धावा करुन चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीनंतर उथप्पाने दुसऱ्या क्रमांकाच्या धावा केल्या होत्या.