लखनऊ सुपर जायंट्सला मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने गोलंदाजी आणि फलंदाजीत सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. त्याने सांगितले की संघाला फलंदाजीत फाफ डू प्लेसिससारखीच भागीदारी आवश्यक आहे. लखनऊला सात सामन्यांत तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चांगली सुरुवात करूनही गोलंदाजांनी समोरच्या संघाला १५ ते २० धावा अधिक दिल्या असेही केएल राहुलने म्हटले आहे.

“मला वाटते की पहिल्या षटकात आम्ही दोन विकेट्स घेऊन चांगली सुरुवात केली, पण नंतर पॉवरप्लेमध्ये ५० धावा करू दिल्या. आम्ही आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती. मला वाटतं या खेळपट्टीवर १८० धावांसाठी आम्ही त्यांना १५ किंवा २० अतिरिक्त धावा दिल्या,” असे केएल केएल राहुलने सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले.

खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. आम्हाला सुरुवातीच्या विकेट मिळाल्या, ज्याचा आम्ही शोध घेत होतो. पण मधल्या षटकांमध्ये आम्हाला दडपण निर्माण करता आले नाही, असेही राहुल म्हणाला. लक्ष्याचा पाठलाग करताना मोठी भागीदारी आवश्यक असल्याचे राहुलने सांगितले. “आम्हाला मोठ्या भागीदारीची गरज होती. फॅफने आरसीबीसाठी काय केले ते आम्ही पाहिले. मला वाटते की आम्हाला आघाडीच्या तीन किंवा चार फलंदाजांपैकी एकाकडून मोठी खेळी हवी होती,” असे केएल राहुल म्हणाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्णधार आणि सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर सुरुवात करताना सहा बाद १८१ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात लखनऊचा संघ जोश हेझलवूडच्या (२५ धावांत चार बळी) भेदक गोलंदाजी समोर आठ विकेटसोबत १६३ धावाच करू शकला. हर्षल पटेलने ४७ धावांत दोन तर ग्लेन मॅक्सवेलने ११ धावांत एक विकेट घेतली. शाहबाज अहमदने गोलंदाजी करताना चार षटकांत केवळ २५ धावा दिल्या. लखनऊकडून कृणाल पांड्याने ४२ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सच्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कृणाल पांड्याने २८ चेंडूत ४२ धावा केल्या. कर्णधार केएल राहुल ३० धावांवर हर्षल पटेलचा बळी ठरला. त्याचवेळी क्विंटन डी कॉक तीन आणि मनीष पांडे सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. या दोन्ही फलंदाजांना जोश हेझलवूडने बाद केले.