मुंबई : केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडे भारताचे भावी नेतृत्वक्षम क्रिकेटपटू म्हणून पाहिले जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट लढतीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

राहुल आणि पंत हे दोघेही विजयवीर म्हणून ओळखले जातात. देशाचे प्रतिनिधित्व करताना आणि गेल्या काही वर्षांतील ‘आयपीएल’च्या व्यासपीठावर या दोघांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. दिल्लीने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्धचा एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे, लखनऊ संघाने गुजरात टायटन्सकडून पहिल्या सामन्यात हार पत्करली, परंतु त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादला हरवत विजयी घोडदौड राखली आहे.

वॉर्नर, नॉर्किएमुळे दिल्ली भक्कम

धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची उपलब्धता आणि वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किए दुखापतीतून सावरल्याने दिल्लीची ताकद वधारली आहे.  त्यामुळे टिम सेफर्टला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे नॉर्किएसाठी रोव्हमन पॉवेल किंवा मुस्ताफिजूर रेहमान यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल. वॉर्नर पृथ्वी शॉ याच्या साथीने दमदार सलामी नोंदवेल, अशी दिल्लीला अपेक्षा आहे.

स्टॉइनिसचा समावेश?

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या समावेशामुळे लखनऊच्या सामर्थ्यांत भर पडली आहे. स्टॉइनिससाठी अ‍ॅन्ड्रय़ू टाय किंवा एव्हिन लेविस यांच्यापैकी एकाला विश्रांती दिली जाईल. जेसन होल्डरकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. राहुलने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध चांगल्या खेळी साकारल्या आहेत.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)