पीटीआय, पुणे : सलग तीन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघाने दमदार पुनरागमनाचा निर्धार केला असून शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल. मुंबईच्या संघाने यंदाच्या हंगामाची निराशाजनक सुरुवात केली आहे. त्यांना दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, सलामीच्या लढतीत पंजाब किंग्जकडून पराभूत झाल्यानंतर बंगळूरुने कामगिरीत सुधारणा करताना कोलकाता आणि राजस्थानवर मात केली.
रोहित, पोलार्डकडून अपेक्षा
मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने यंदा तीन सामन्यांत अनुक्रमे ४१, १० आणि ३ धावा केल्या. तसेच अष्टपैलू किरॉन पोलार्डही अपयशी ठरला आहे. त्यामुळे मुंबईला रोहित आणि पोलार्ड या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. गोलंदाजीत केवळ जसप्रीत बुमरा प्रभावी ठरला आहे. बंगळूरुविरुद्ध डॅनियल सॅम्सच्या जागी फॅबियन अॅलन किंवा रायली मेरेडीचला संधी मिळू शकेल.
मॅक्सवेलकडे लक्ष
सलग दोन सामने जिंकलेल्या बंगळूरुसाठी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक विजयवीराची भूमिका चोख बजावत आहे. मात्र, कर्णधार फॅफ आणि विराट कोहली यांनी कामगिरी उंचावणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन होणार असून बंगळूरुच्या मधल्या फळीला अधिक बळकटी मिळेल.
- वेळ : सायं. ७.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी