मुंबई : गुजरात टायटन्सच्या भेदक मारा विरुद्ध पंजाब किंग्जची भक्कम आघाडीची फळी यांच्यातील द्वंद्व इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात पाहायला मिळेल.

गुजरात आणि पंजाब या दोघांनी संघबांधणीचा उत्तम समतोल साधला असल्याने ब्रेबॉर्न स्टेडियमवरील हा सामना रंगतदार होऊ शकेल. पंजाबने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. पॉवरप्लेच्या षटकांत हल्लाबोल करायचा आणि उर्वरित डावांत धावांचा हाच वेग राखण्याचे समीकरण पंजाबने जोपासले आहे. दुसरीकडे, गुजरातने आपले दोन्ही सामने जिंकत विजयी घोडदौड राखली आहे.

लिव्हिंगस्टोनवर मदार

लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन आणि भानुका राजपक्षा यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची प्रमुख मदार आहे. परंतु कर्णधार मयांक अगरवाल आणि एम. शाहरूख खान यांनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. फिरकी गोलंदाज राहुल चहरच्या खात्यावर सर्वाधिक सहा बळी जमा आहेत. परंतु कॅगिसो रबाडा, लिव्हिंगस्टोन, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, ओडीन स्मिथ यांच्यामुळे पंजाबचा मारा वैविध्यपूर्ण झाला आहे.

फलंदाजीत सातत्याचा अभाव

शुभमन गिल, हार्दिक पंडय़ा, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर यांच्यावर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त आहे. परंतु या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे. सलामीवीर विजय शंकर आणि मॅथ्यू वेड यांचा खेळ अपेक्षेप्रमाणे उंचावलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)