आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६८ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला धूळ चारली. चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी १५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र राजस्थानने ही धावसंख्या पाच गडी राखत गाठले. या विजयासह राजस्थानने क्वॉलिफायर १ मधील आपले स्थान पक्के केले असून या संघाने गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या विजयाचा शिलेदार आर अश्विन ठरला. संघ अडचणीत असताना अश्विनने २३ चेंडूंमध्ये ४० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> ४, ४, ६, ४… मोईन अली तळपला! चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात केली धडाकेबाज खेळी

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १५१ धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थानला कसरत करावी लागली. सलामीला आलेल्या जोस बटलरने निराशा केली. त्याने अवघ्या दोन धावा केल्यामुळे संघ अडचणीत आला. मात्र बटलरसोबत आलेल्या यशस्वी जैसवालने आपली भूमिका चोख बजावली. त्याने ४४ चेंडूमध्ये ५९ धावा केल्या. प्रशांत सोळंकीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्याआणि तिसऱ्या विकेटसाठी आलेले संजू सॅमसन (१५) आणि देवदत्त पडिक्कल (३) खास कामगिरी करु शकले नाही. मात्र आर अश्विनने संघाची धुरा संभाळत वेळ मिळेल तसे मोठे फटके लगावले. त्याने २३ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. परिणामी संघ मजबूत स्थितीत पोहोचला. शेवटी त्यानेच संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढच्या पर्वात खेळणार का ? निवृत्तीबद्दल माहीने स्पष्टच सांगितले, म्हणाला…

याआधी नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरला. चेन्नईचे सलामीचे दोन्ही फलंदाज चांगली खेळी करु शकले नाहीत. ऋतुराज गायकवाडने अवघ्या दोन धावा केल्या. तर ड्वेन कॉन्वे १६ धावांवर पायचित झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या मोईन अलीने मात्र संघाची जबादारी स्वीकारत ५७ चेंडूंमध्ये ९३ धावा केल्या. मोईन अलीला साथ देत धोनीने २६ धावा केल्या. धोनी आणि मोईन अली वगळता चेन्नईचा एकही फलंदाज चांगला खेळ करु शकला नाही. एन जगदीशन (१), अंबाती रायडू (३) या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे वीस षटके संपेपर्यंत चेन्नई संघ १५० धावा करु शकला.

हेही वाचा >>> ड्रेसिंग रुममध्ये त्रागा करणं भोवलं, आयपीएलने मॅथ्यू वेडवर केली ‘ही’ कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर राजस्थानच्या युझवेंद्र चहलने नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी केली. चहलने अंबाती रायडू आणि महेंद्रसिंह धोनी अशा आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं. तसेच ओबेड मॅक्कॉयनेही मोईन अली आणि जगदीशन यांना तंबुत पाठवून चेन्नईच्या धावफलकाला ब्रेक लावला. ट्रेंट बोल्ट आणि आर अश्विन यांनी प्रत्येक एक बळी घेतली.