आयपीएल २०२२च्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्सची यंदाही चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यांचा संघ या हंगामातही शानदार क्रिकेट खेळत असून मीडियात चर्चेत आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन हा संघाचा कणा आहे. कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली तुफानी फलंदाजीने आयपीएल २०२३मध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज राजस्थानचा सामना आयपीएलमधील गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे.
रॉयल्सने सीएसकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर हंगामातील पहिला सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत आता राजस्थानला सवाई मानसिंग स्टेडियमवर विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. या मेगा सामन्यापूर्वी संजू सॅमसन राजस्थानच्या होम ग्राउंडवर चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता. त्याने चाहत्यांसोबत चांगलाच वेळ घालवला. त्यादरम्यान, सॅमसनने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
सॅमसनने चाहत्याचा फोन उचलला
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सवाई मानसिंग स्टेडियमवर चाहत्यांशी संवाद साधताना दिसला. त्याने राजस्थानच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढल्या. दरम्यान, सेल्फी घेताना सॅमसनला एका चाहत्याचा फोन आला आणि तो त्याने घेतला. जेव्हा सॅमसनने फोन उचलला तेव्हा अचानक फोनवर तो म्हणाला की, “हॅलो कोण बोलत आहे?” “समोरून उत्तर आले मी तुमचा चाहता बोलतो आहे संजू भैया.” सुरुवातीला काय करावे हे सॅमसनला कळेना. मात्र यानंतर सॅमसन फोनवर त्याच्याशी गप्पा मारू लागला. सॅमसनला तो चाहता म्हणाला, “संजू भैया बोलो कैसे हो आप? हां भाई, क्या हाल हैं?” यावर संजू म्हणाला, “बोलो भैया मे ठीक हू.”
संजूने फोनवर उपस्थित व्यक्तीशी छान गप्पा मारल्या. तो म्हणाला, “हो भाऊ मी छान आहे, तुम्ही कसे आहात?” संजूच्या या फॅन मोमेंटचा व्हिडिओ स्वतः राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे. तो की ‘डाऊन टू अर्थ’ आहे हे यातून कळते. याशिवाय संजू सॅमसनच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, संजूने आयपीएल २०२३ मध्ये एकूण ७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १५८च्या तुफानी स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना १८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकेही झळकली आहेत.
चेन्नईसमोर २०३ धावांचे लक्ष्य
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. त्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर २०३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५० चेंडूत ८६ धावांची भागीदारी केली.