IPL 2024, Gujarat Titans vs Mumbai Indians: हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सच्या संघाने ८ धावांनी पराभव केला. त्यापू्र्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या नाणेफेकीदरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याविरुद्ध प्रेक्षकांनी रोहितच्या घोषणा दिल्या. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद दिल्याने मुंबईचा चाहतावर्ग खूपच नाराज आहे. सोशल मिडियानंतर मैदानातही याचा प्रत्यय आला. प्रेक्षक रोहितच्या घोषणा देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हार्दिक गेल्या मोसमापर्यंत गुजरात टायटन्सचा भाग होता. पण या हंगामाच्या लिलावापूर्वीच त्याची मुंबई इंडियन्समध्ये बदली झाली. तिथे रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातही मुंबई इंडियन्स आय़पीएलमधील आपला पहिला सामना जिंकू शकली नाही.

हार्दिक पांड्या अनेक कारणांमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. गुजरात सोडून हार्दिक मुंबईच्या संघात गेल्याने चाहते त्याच्यावर नाराज आहेत. त्याचवेळी रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यानंतरही चाहत्यांमध्ये हार्दिक पांड्याबद्दल नाराजी आहे. नाणेफेकीच्या वेळी रवी शास्त्रींनी हार्दिक पांड्याचे नाव घेताच चाहत्यांनी एकच गोंधळ सुरू केला. रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन चाहतेही पोहोचले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. यावेळी प्रेक्षकांनी रोहितच्या नावाने घोषणाबाजी केली. या षटकात हार्दिक पांड्याने दोन चौकार मारत ११ धावा दिल्या. या सामन्यात त्याने गोलंदाजी करत ३ षटकात ३० धावा दिल्या. तर फलंदाजी करताना ४ चेंडूत एक चौकार आणि षटकार मारत ११ धावा करून बाद झाला. पण संघाला मात्र तो विजय मिळवून देऊ शकला नाही.

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू केविन पीटरसनच्या ट्विटनेही सर्वांचे लक्ष वेधले. बुमराह संघात असतानाही पांड्याने सामन्याची सुरूवात गोलंदाजीने का केली, हा प्रश्न पीटरसननेही उचलून धरला. हार्दिकच्या विरोधात चाहत्यांची घोषणाबाजी पाहून पीटरसनही आश्चर्यचकित झाला. त्याने ट्विटमध्ये म्हटलं, “अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याला ज्या पध्दतीने ट्रोल केलं जात आहे, तसं मी कोणत्याच भारतीय खेळाडूविरूध्द होताना आतापर्यंत अनुभवलेलं नाही. ही खूपच दुर्मिळ बाब आहे.”