मुंबई इंडियन्स विरूद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात नव्या गोलंदाजाला संघात सामील केले आहे. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडच्या फलंदाजाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेतले होते. दिल्ली कॅपिटल्सने मोठ्या प्रतिक्षेनंतर हा निर्णय घेतला आहे. या धडाकेबाजला पर्याय म्हणून दिल्लीने संघात गोलंदाजाची निवड केली आहे.

मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. त्या सामन्यात नॉर्कियाने अखेरच्या षटकात ३२ धावा दिल्या नसत्या तर कदाचित दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा सामन्यात विजय मिळवू शकला असता. दिल्लीने आतापर्यंत झालेल्या ५ पैकी ४ सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. गेल्या २ सामन्यांमध्ये त्यांच्याविरूद्ध २०० अधिक धावसंख्या उभारल्याने नेट रन रेटमध्ये त्यांना मोठा फटका बसला.

२०२१ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, दक्षिण आफ्रिकेकडून विल्यम्सने दोन कसोटी, चार एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विल्यम्सने वनडेमध्ये ५ तर कसोटीत ३ विकेट्स आपल्या नावे केले आहेत. तर ११ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये १६ विकेट घेतले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत विधानानुसार, तो ५० लाखांच्या मूळ किमतीसह हॅरी ब्रुकचा बदली खेळाडू म्हणून दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका टी-२० चॅलेंजमध्ये टायटन्ससाठी ९ सामने खेळला असून विल्यम्स चांगल्या फॉर्ममध्ये आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने यावर्षीच्या एसए-२० हंगामात सुपर किंग्ससाठी ९ सामन्यात १५ विकेट घेतले. सीझनमधून बाहेर पडलेल्या ब्रूकला कॅपिटल्सने लिलावात ४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. फेब्रुवारीमध्ये त्याच्या आजीचे निधन झाल्यानंतर ब्रूकने आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आयपीएल २०२४ मधून माघार घेतली. फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात झालेल्या इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठीही हा युवा फलंदाज उपलब्ध नव्हता.