IPL 2024, Lucknow Super Giants vs Punjab Kings: आयपीएल २०२४ मधील ११वा सामना आज म्हणजेच ३० मार्चला पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघामध्ये खेळवला जात आहे. पंजाबच्या संघाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर आहे तर लखनऊ सुपर जांयट्सच संघाचे नेतृत्त्व केएल राहुलकडे आहे. पण पंजाबविरूध्दच्या सामन्यात नाणेफेकीसाठी संघाचा उपकर्णधार निकोलस पुरन आला होता. ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगितले की, केएल राहुल हा आताच दुखापतीतून सावरला आहे. ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला ब्रेक देत आहोत. पण आजच्या सामन्यात केएल राहुल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे.

निकोलस पुरन नाणेफेकीला आल्यानंतर केएल राहुल आजच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही असे वाटले होते. कारण राहुल नुकताच दुखापतीतून सावरला होता, आयपीएलसोबतच टी-२० विश्वचषक तोंडावर असताना पुन्हा त्याला दुखापत झाल्यास तो टीम इंडियालाही याचा फटका बसला असता. केएल राहुल या सामन्यात फक्त फलंदाजी करताना दिसणार आहे. तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरणार नाही. म्हणून तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. केएल राहुलला त्याची दुखापत आणि आगामी टी-२० विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट करण्यासाठी ही विश्रांती दिली जात आहे. तसे पाहता इम्पॅक्ट प्लेयर नियम हा आयपीएलमध्ये सर्वच संघ फार हुशारीने हाताळताना दिसत आहेत.

आयपीएलमधील या नियमामुळे प्रत्येक संघाला प्लेईंग इलेव्हनशिवाय एक अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाजाला खेळवण्याची संधी मिळते, ज्यामुळे संघात ताळमेळ राखला जातो. अमित मिश्रा, दिनेश कार्तिक इ. सारखे वयस्कर खेळाडू इतक्या असह्य उकाड्यात संपूर्ण ४० षटके खेळवण्याऐवजी त्यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून इतर फलंदाजाला संघात संधी दिली जाते.

इम्पॅक्ट प्लेयर नियम नेमका काय आहे?

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार ५ पर्यायी खेळाडूंची नावे देतात. कर्णधाराने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवडलेल्या या चार खेळाडूंमधून संघ कोणत्याही एका खेळाडूची निवड करू शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजी संघ या खेळाडूचा वापर सामन्यात केव्हाही करू शकताता. आयपीएल २०२३ मध्ये प्रथमच हा नियम अंमलात आणण्यात आला.

आयपीएलने जारी केलेल्या नियमांच्या कलम १.३ नुसार, संपूर्ण सामन्यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअरला कधीही बोलावले जाऊ शकते. कोणतेही षटक संपल्यानंतर, कोणताही खेळाडू रिटायर्ड हर्ट किंवा विकेट पडल्यानंतर फलंदाजी करणारा संघ त्याला फलंदाजीसाठी बोलावू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, कोणताही संघ सामन्यात कोणत्याही वेळी फलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकतो. जेव्हा प्लेईंग इलेव्हनशिवाय हा इम्पॅक्ट प्लेअर १२वा खेळाडू म्हणून फलंदाजीला येतो तेव्हा १२ खेळाडू फलंदाजी करतील असे नाही. तर इम्पॅक्ट प्लेअरसह कोणताही संघ कोणत्याही डावात केवळ ११ फलंदाजांसह फलंदाजी करू शकेल.

एका सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम किती वेळा वापरला जाऊ शकतो?

नियमांनुसार, गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा संघ सामन्यात फक्त एकदाच इम्पॅक्ट प्लेयर नियम वापरू शकतो आणि नवीन खेळाडूला बोलावू शकतो. एकदा वापरल्यानंतर, मैदानाबाहेर गेलेला खेळाडू पुन्हा परत येऊ शकणार नाही.

विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर कसा बनू शकतो?

नियमांनुसार, विदेशी खेळाडू देखील इम्पॅक्ट प्लेयर बनू शकतो परंतु यासाठी नियम आहे. आयपीएलच्या कोणत्याही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू खेळत असतील तर तो परदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर नियम वापरू शकत नाही. परंतु जर प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ पेक्षा कमी विदेशी खेळाडू असतील तर अशा परिस्थितीत विदेशी खेळाडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही मैदानात उतरवले जाऊ शकते. यासाठी नाणेफेकीनंतर कर्णधाराने दिलेल्या पर्यायांच्या यादीत विदेशी खेळाडूचे नाव असणे आवश्यक आहे.