IPL 2024, Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants: यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या मयंक यादवने आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. लखनऊ सुपरजायंट्सच्या या वेगवान गोलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. या सामन्यात मयंकने चार षटकात केवळ १४ धावा दिल्या ज्यात त्याने ३ विकेट घेतले. त्याच्या दमदार खेळामुळे त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. सलग दोन सामन्यांमध्ये त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मयंक यादवने या सामन्याच ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांच्या विकेट्स घेतल्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला तो म्हणजे १५६.७ किमी प्रतितास एवढा. तर पहिल्या सामन्यात मयंकने १५५.८ किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. फक्त दोन सामन्यांत सहा विकेट्स घेऊन मयंकने आधीच आयपीएल २०२४ च्या पर्पल कॅप क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीतील अव्वल ५ जणांनी तीन सामन्यांत गोलंदाजी केली आहे.

मयंक यादव आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. ज्याला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. याआधी कोणत्याही खेळाडूने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली नव्हती. यासह मयंक हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. या यादीत शॉन टेट पहिल्या स्थानावर आहे, ज्याने २०११ मध्ये १५७.७ किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला आहे. तर दुसऱ्या स्थानी लॉकी फर्ग्युसन, तिसऱ्या क्रमांकावर उमरान मलिक आहे.

आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना चकित करणाऱ्या मयंक यादवला देशासाठी खेळायचं आहे. सामन्यानंतर मयंक म्हणाला,’आयपीएलमधील माझ्या गोलंदाजीवर मी खूप खूश आहे,सलग दोन वेळा मी सामनावीर ठरलो पण त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोन्ही सामने जिंकलो. भारतीय संघात खेळणे हे माझे पुढील ध्येय आहे. माझ्यासाठी ही फक्त सुरुवात आहे आणि मला अजून पुढे जायचे आहे.

मयंकला आरसीबीविरूद्धच्या सामन्यातील आवडती विकेट कोणती हे विचारल्यावर तो म्हणाला, ‘कॅमेरून ग्रीन, मला वाटतं या वेगाने गोलंदाजी करण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहार, पुरेशी झोप, प्रशिक्षण. जर आपण वेगवान गोलंदाज आहोत तर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण परिपूर्ण असल्या पाहिजे. त्यामुळे सध्या मी माझ्या आहारावर आणि रिकव्हरीवर खूप लक्ष केंद्रित करत आहे.”

मयंक यादवच्या दमदार गोलंदाजीमुळे लखनऊ सुपरजायंट्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २८ धावांनी पराभव केला. या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनऊने १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ १५१ धावा करून सर्वबाद झाला.