IPL 2024, Punjab Kings vs Delhi Capitals: ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यावर खिळल्या होत्या. पण पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने ४ चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य गाठले. सॅम करन संघाच्या विजयाचा नायक ठरला. ४५४ दिवसांनंतर मैदानात आलेला पंत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. सामन्यानंतर ऋषभ पंत म्हणाला की तो मैदानावर सुरूवातीला थोडा नर्व्हस होता.

सामना संपल्यानंतर ऋषभ पंतने मोठी खेळी न खेळण्याचे कारण सांगितले. पंत म्हणाला, “मी थोडा बावरलो होतो, पण जेव्हा तुम्ही बऱ्याच काळानंतर मैदानात उतरता तेव्हा तुम्हाला यातून जावे लागते. पण मैदानात परतल्याचा मला आनंद आहे. मला वाटतं की आम्ही केलेली धावसंख्या बरोबर होती, पण दुखापतीमुळे आमच्याकडे एक गोलंदाज कमी होता. त्यामुळे आम्ही सामन्यात फार काही करू शकलो नाही. खेळपट्टीकडून आम्हाला जशी अपेक्षा होती, तसंच घडलं, कोणतीही सबब सांगता येणार नाही. यातून आम्ही धडा घेऊ.”

दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. इशांतने मैदाबानाहेर जाण्यापू्र्वी फक्त २ षटके टाकली होती. पंत म्हणाला, “इशांतची दुखापत स्पष्टपणे दिसत होती. आमच्याकडे आधीच एक खेळाडू कमी होता. फलंदाजीत आम्ही थोडे मागे होतो. पण अभिषेक पोरेल आला आणि त्याने काही धावा केल्या, त्या महत्त्वाच्या होत्या. एक उत्कृष्ट इनिंग तो खेळला, त्याचं अभिनंदन. माझ्यामते हा त्याचा तिसरा किंवा चौथा सामना आहे परंतु त्याने ज्या प्रकारची प्रभावी फलंदाजी केली ती खूप महत्त्वपूर्ण होती. आमच्याकडे अतिरिक्त गोलंदाजाची कमतरता होती. सामन्याच्या अखेरीस आम्ही खरोखरच पुनरागमन केले, पण आम्ही जिंकू शकलो नाही. तो खेळाचा भाग आहे. पण पंजाब किंग्ज संघानेही चांगली कामगिरी केली.”