IPL 2024, Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सचा डावखुरा फिरकीपटू मणिमरन सिद्धार्थ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्यात मणिमरनने विराट कोहलीला आपल्या गोलंदाजीवर बाद केलं. या विकेटसह त्याने संघाच्या प्रशिक्षकांना दिलेले वचनही पूर्ण केले. आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊने आपल्या ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर खेळाडूंशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी सिध्दार्थचा एक किस्सा सांगितला.

या व्हिडिओमध्ये लँगर यांनी सिध्दार्थचा एक किस्सा सांगताना सांगितलं. तू विराटला आऊट करू शकतोस असं मी त्याला म्हटलं आणि त्याने करुन दाखवलं. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी सिध्दार्थ नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता, तेव्हा जस्टिन लँगर यांनी त्याला आर्म बॉल टाकताना पाहिले. सिद्धार्थची गोलंदाजी पाहून लँगर यांनी विराट कोहलीची विकेट घेणार का, असा प्रश्न त्याला केला. सिद्धार्थने प्रशिक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देत ‘हो सर’ म्हणाला. यानंतर सामन्यात जे घडलं ते साऱ्या जगानं पाहिलं विराट कोहली आर्म बॉलसमोर नेहमीच डगमगताना दिसला. मणिमरनच्या गोलंदाजीवरही विराट सारखाच गोंधळताना दिसला.

इरफान पठाणसारखा वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सिद्धार्थला त्याच्या गोलंदाजीत वेग कमी असल्याचे त्याला सांगितले आणि त्यानंतर तो फिरकी गोलंदाजीकडे वळला. पण चेंडू स्विंग करण्याची त्याच्याकडे असलेली क्षमता कायम राहिली. सिध्दार्थ हा त्याच्या फिरकीसह वेगासाठीही ओळखला जातो. त्याने विराटला दोन वेगवान चेंडू टाकल्यानंतर पुढच्या चेंडूचा वेग कमी केला. कमी वेगाचा चेंडू आल्याने कोहली चूक करून बसला. त्याने फ्लिक शॉट मारला आणि पडिक्क्लने तो झेल टिपला. एलएसजीसाठी ही महत्त्वाची विकेट होती कारण कोहली २२ धावांवर खेळत होता आणि आपल्या चांगल्या फॉर्मातही होता.

कोहलीला आऊट करणं हे त्याचे स्वप्न होते असे सिद्धार्थ म्हणाला. “विराटला बाद करण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते, तुम्ही कोणालाही विचारा. एका गोलंदाजासाठी ही सर्वात मोठी विकेट आहे.”