IPL 2024, Mumbai Indians vs Rajasthan Royals: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात मुंबईचा घरच्या मैदानावर पराभव झाला. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवरही मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोल केले जात होते. वारंवार थांबवल्यानंतरही चाहते हार्दिकची हुर्यो उडवली जात होती. हार्दिक फलंदाजीला आला तेव्हाही त्याचे स्वागत ट्रोल करत झाले आणि तो आऊट झाल्यावरही अशीच वागणूक दिली गेली. पण याच सामन्यात फिल्डिंग करत असतानाचा रोहित शर्माचा एक व्हीडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना हार्दिकला ट्रोल करू नये असे सांगताना दिसत आहे.

संपूर्ण स्टेडियममध्ये हार्दिक पंड्याविरोधात रोहित-रोहित अशी नारेबाजी सुरू केली. पहिल्याच सामन्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणि हैदराबादमध्येही अशाच प्रकारे हार्दिकची हुर्यो उडवली गेली होती. हार्दिकला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद दिल्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड रोष आहे, ज्याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळेच हार्दिक चाहत्यांच्या चांगल्याच निशाण्यावर आहे. मात्र,पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं. राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईची अवस्था फारच बिकट होती आणि त्यावेळेस रोहित सीमारेषेजवळ फिल्डिंगला येताच चाहत्यांनी रोहित-रोहितच्या घोषणा सुरू केल्या. पण रोहितने तेव्हा चाहत्यांना शांत राहण्यास इशारा करत सांगितले.

सामन्यातील १०व्या षटकात, चाहत्यांकडून ‘रोहित, रोहित’ अशी नारेबाजी सुरू होती. तेव्हा रोहित सीमारेषेजव उभा होता. जेव्हा चेंडू हार्दिक पंड्याकडे आला तेव्हा प्रेक्षकांनी एकच आवाज करायला सुरूवात केली. पण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माजी कर्णधाराने चाहत्यांना ही नारेबाजी थांबवण्याचा इशारा केला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

या व्हीडिओमागचं नेमकं सत्य काय?

रोहित शर्माच्या या व्हायरल व्हीडिओमध्ये हार्दिकला ट्रोल करू नये, असे तो चाहत्यांना सांगत असल्याचे व्हीडिओ समोर येत आहेत. पण फ्रीप्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार गरवारे स्टँडमध्ये बसलेल्या एका सूत्राने सांगितले की, रोहित सीमारेषेजवळ येताच चाहत्यांनी जोरजोरात घोषणा सुरू केल्या. रोहितने इशारा केल्यावर चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ चा घोषणा दिल्या आणि हेच थांबवा आणि शांत राहा असा इशारा रोहितने केला. जेव्हा रोहित तिथे क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा, हार्दिक पांड्याविरुद्ध कोणतीही घोषणाबाजी केली जात नव्हती. याबाबतचा एक व्हीडिओही फ्रि प्रेस जर्नलने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील सलग तिसरा सामना गमावला आहे. रोहित शर्माने आता चाहत्यांना शांत राहण्यास सांगितल्याने आगामी सामन्यांमध्ये चाहते हार्दिक पांड्याला वेठीस धरणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या फलंदाजी करताना हार्दिकने निश्चितच चांगली कामगिरी केली. यावेळी चाहत्यांनीही त्याला साथ दिली. पण त्यानंतर त्याने मैदानात झेल सोडल्यानंतर चाहत्यांनीही त्याच्यावर पुन्हा जोरदार टीका सुरू केली.

युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीनंतर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून आणि २७ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. रियान परागच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईच्या १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सने परागच्या अर्धशतकाच्या बळावर १५.३ षटकांत चार गडी गमावून १२७ धावा करून विजय मिळवला. मुंबईकडून आकाश मधवालने २० धावांत तीन विकेट घेतले.