How RCB Will Qualify for IPL 2025 Playoffs: आयपीएल २०२५ ला १७ मे पासून म्हणजेच आज स्थगितीनंतर पुन्हा सुरूवात झाली. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांंमध्ये खेळवला जाणार होता. पण पावसामुळे बंगळुरूमध्ये होणारा हा सामना पावसामुळे नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला. त्यामुळे आता दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. यानंतर प्लेऑफचं समीकरण कसं बदललं आहे, जाणून घेऊया.

आरसीबी वि. केकेआर सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. यासह केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. तर दुसरीकडे आरसीबीचा संघ १२ सामन्यांत सर्वाधिक १७ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. पण संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे आरसीबी संघ अजूनही टेन्शनमध्ये आहे.

१२ सामन्यांत १७ गुणांसह जरी आरसीबीने अव्वल स्थानावर झेप घेतली असली तरी संघाला प्लेऑफसाठी पात्रता निश्चित करता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ १७ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला असला तरी. त्याचा प्लेऑफमधील प्रवेश अद्याप निश्चित झालेला नाही. गुजरात टायटन्स सध्या ११ सामन्यांनंतर १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असल्याने त्यांना सध्या बाद होण्याचा धोका आहे. तर मुंबई इंडियन्स १२ सामन्यांनंतर १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जर या दोन्ही संघांना लीग टप्प्यात १८-१८ गुण मिळाले आणि दुसरीकडे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी १७ गुण मिळवले तर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण होईल.

IPL 2025 Points Table After RCB vs KKR Match Abandoned Due to Rain
RCB vs KKR सामन्यानंतर IPL 2025चं समीकरण

पंजाब संघाने ११ सामन्यांनंतर १५ गुण मिळवले आहेत. तर दिल्ली संघाचे ११ सामन्यांत १३ गुण आहेत. याचा अर्थ असा की या दोघांसाठी आरसीबीच्या १७ गुणांची बरोबरी करणं कठीण काम असणार नाही. त्यामुळे, तिन्ही संघांचे १७-१७ गुण असतील आणि नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावेल.

सध्या, बेंगळुरू (+०.४८२) चा नेट रन रेट पंजाब (+०.३७६) आणि दिल्ली (+०.३६२) पेक्षा चांगला आहे. पण तिघांमध्ये फारसा फरक नाही. SRH आणि LSG विरुद्ध पराभव झाल्यानंतर बंगळुरू संघ खाली येऊ शकतो. जर असं झालं तर आरसीबी प्लेऑफमधून बाहेर पडेल.

RCBला प्लेऑफ गाठण्यासाठी काय करावं लागेल?

आरसीबीला आता टॉप चारमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांपैकी एक तरी सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. पण, जर रविवारी पंजाब किंग्ज किंवा दिल्ली कॅपिटल्स या संघांपैकी एका संघाने जरी सामना गमावला तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरेल. याशिवाय आरसीबीला जर टॉप-२ मध्ये राहायचं असेल तर संघाला दोन्ही सामने जिंकावे लागतील.